कोल्हापूर जिल्ह्यात ६२ टक्केच पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात आजअखेर वार्षिक सरासरीच्या केवळ ६२.८६ टक्केच पाऊस झाला आहे. चेरापुंजी अशी ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्‍यात अजूनपर्यंत ५० टक्केच पाऊस झाला आहे; तर शाहूवाडी, कागल तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात आजअखेर वार्षिक सरासरीच्या केवळ ६२.८६ टक्केच पाऊस झाला आहे. चेरापुंजी अशी ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्‍यात अजूनपर्यंत ५० टक्केच पाऊस झाला आहे; तर शाहूवाडी, कागल तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 

सर्वसाधारणपणे ७ जून या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाला सुरवात होते; पण पावसाची नोंद ही १ जूनपासूनच ठेवली जाते. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १७७२ मिलिमीटर पाऊस होतो. जून व जुलै महिन्यातही पावसाने चांगलीच दडी मारली होती; पण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १११४.१५ मिमी पाऊस झाला आहे. पावसाची ही टक्केवारी वार्षिक सरासरीच्या ६२.८६ टक्के आहे. 

गगनबावड्याची ओळख जिल्ह्यातील चेरापुंजी अशी आहे. तेथे पावसाची वार्षिक सरासरी ५६२९.४० मिलिमीटर आहे; पण आजअखेर या तालुक्‍यात केवळ २८१७.५० मिलिमीटरच पाऊस झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५०.०५ आहे. शाहूवाडी व कागल तालुक्‍याची वार्षिक सरासरी अनुक्रमे १५४२.३० व ६४९.० मिलीमीटर आहे; पण आजअखेर शाहूवाडी तालुक्‍यात १५६७.० मिलिमीटर तर कागलमध्ये ७८०.२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शाहूवाडी तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या १०१.६०; तर कागलमध्ये १२०.११ टक्के पाऊस झाला आहे. 

सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस पडत नाही; पण यावर्षीचा पावसाळा त्याला अपवाद ठरला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा जिल्ह्यातील १२ पैकी पाच तालुक्‍यांत शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अनेक तालुक्‍यांतील वार्षिक सरासरीएवढा पाऊस एकट्या सप्टेंबर महिन्यातील १९ दिवसांत झाला आहे. या महिन्यात गगनबावडा तालुक्‍यातही पावसाचे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. अजून काही दिवस पावसाची शक्‍यता आहे. या कालावधीत वार्षिक सरासरी पूर्ण होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त होत आहे. 

राधानगरीत ५० टक्केच पाऊस
सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राधानगरी तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. या तालुक्‍यात दरवर्षी सरासरी ३५०१.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी १९ सप्टेंबरपर्यंत केवळ १५२१.६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ४३.४५ टक्के आहे.