अौषधांची वार्षिक बाजारपेठ ६६० कोटींची...

सुनील पाटील
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कोल्हापूर - बदलणारी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अनिश्‍चित वेळेचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. त्याचे भयावह रूप समजण्यास जिल्ह्यात औषध विक्रीचे आकडेच पुरेसे आहेत.

कोल्हापूर - बदलणारी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अनिश्‍चित वेळेचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. त्याचे भयावह रूप समजण्यास जिल्ह्यात औषध विक्रीचे आकडेच पुरेसे आहेत.

जिल्ह्यात वर्षाला ६६० कोटींच्या औषधांची विक्री होते. यात ५५ टक्के म्हणजेच ३६३ कोटी रुपयांची हृदयविकार आणि मधुमेहाचे औषध विक्री होते. ही धक्कादायक माहिती समोर आली. 

जिल्ह्यात २ हजार ८०० औषध विक्री केंद्र आहेत. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ३८ लाखांपर्यंत आहे. लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी १ हजार ७३६ रुपयांची औषधं खाते. याशिवाय जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून वर्षाला १ कोटी २५ लाख रुपयांची औषधे मोफत दिली जातात. औषध विक्री केंद्रातून मिळालेली माहिती आणि जिल्हा परिषदेच्या माहितीवरून जिल्ह्याचे आरोग्य लक्षात येते. 
धकाधकीचे जीवन, व्यायामाचा अभाव, अनिश्‍चित जेवणाची वेळ या सर्व कारणातून जिल्ह्यात हृदयविकाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. 

हृदयविकारासाठी किंवा  प्राथमिक त्रास सुरू होण्यासाठी वयाची अट राहिली नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठांनी हृदयरोगापासून सावध राहण्यासाठी औषधांचाच पर्याय शोधला आहे. जिल्ह्यात १७-१८ व्या वर्षाच्या तरुणालाही मधुमेहाचा त्रास सुरू होतो. मधुमेहासाठी अनुषंगिक तपासण्या केल्यानंतर कायमस्वरूपी खाव्या लागणाऱ्या टॅबलेट (गोळ्या) तसेच इन्सुलिनच्या उपचारामुळे मधुमेहाच्या औषध विक्रीत वाढ झाली. पाण्यामुळे होणारे साथीचे रोग, ताप, खोकला, डेंगी, कावीळ, मलेरियासह इतर रुग्णांकडून होणाऱ्या औषधांचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील औषध विक्री वाढत आहे. जिल्ह्यात २८०० औषध विक्री केंद्रं आहेत. सर्व केंद्रातून महिन्याला ५५ कोटी रुपयांची औषधांची विक्री होते. यात ३० टक्के हृदयविकार, २५ टक्के मधुमेह अशी दोन आजारांसाठीच ५५ टक्के औषध विक्री होते. उर्वरित औषधांची इतर आजारांसाठी विक्री होते.
- मदन पाटील,
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष

जिल्हा परिषदेकडून औषधांसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी उपलब्ध आहे. हा निधी औषधाच्या स्वरूपात जि. प. आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून वाटप केला जातो.
 - डॉ. उषादेवी कुंभार,
जिल्हा परिषद प्रभारी आरोग्य अधिकारी

जिल्ह्यात वर्षाला होणारी औषध विक्री

  •  हृदयविकार- १९८ कोटी   
  •  मधुमेह - १६५ कोटी 
  •  व्हायरल इन्फेक्‍शन- १०० कोटी
  •  इतर सर्व प्रकारच्या आजारांवरील औषधे- १९७ कोटी

जिल्ह्यातील औषध विक्री व वाटप होणारे केंद्र  

  • जिल्ह्यातील एकूण मेडिकल्स - २८०० 
  • कोल्हापूर शहर- ४५० 
  • जि. प., ७४ आरोग्य केंद्र
  • उपकेंद्रे - ४१३
  • ग्रामीण रुग्णालय- १८
Web Title: Kolhapur News 660 cores medicinal annual market