कोल्हापूरात साकारणार 88 कि. मी.चा रिंगरोड

कोल्हापूरात साकारणार 88 कि. मी.चा रिंगरोड

कोल्हापूर - शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने  88 कि.मी. लांबीचा बाह्यवळण मार्ग अर्थात रिंगरोडला मान्यता दिली आहे. कोल्हापुर शहराभोवतालच्या 23 गावांमधील 28 रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यासाठी एकूण सव्वाचारशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

यंदा 40 कोटीची तरतूद करुन अवघड आणि अडचणीचा असणारा रिंगरोडचा मार्ग सुकर केला आहे. अर्थात रस्ते विकासातील रिंगरोड या ऐतिहासिक पर्वसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लाभलेले पाठबळ नजरेआड करता येणार नाही.

शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाच्या सुविधेस अनन्यसाधारण महत्व आहे. रस्ते ह्या विकासाच्या धमन्या म्हटल्या जातात ते खरचं आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरातील रस्ते किती प्रगस्त, चांगले, स्वच्छ आणि दर्जेदार आहेत, यावरच अवलंबून असतो. आज कोल्हापूरातील सर्वच्या सर्व म्हणजे 9 ते 10 एन्ट्री पॉईंटचे रस्ते कसे प्रशस्त आणि देखणे आहेत, त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला मोलाची मदत होत आहे.

आता शहरांतर्गत वाहतूकही वाढली असून शहरात बहुतांश सर्वच ठिकाणी वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे अनेक प्रसंग पाहायला मिळत आहेत. शहरात असणारी वाहणे तसेच व्यापार-व्यवसायाबरोबरच पर्यटनासह अनेक कारणांनी शहरात येणाऱ्या तसेच शहरातून मार्गस्थ होणाऱ्या  वाहनांची संख्याही बरीच वाढली आहे. त्यामुळे शहरांच्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. हा ताण काहीअंशी कमी करण्यासाठी शहराबाहेरुन काढण्यात येत असलेला रिंगरोड सर्वार्थांने महत्वाची भूमीका बजावेल.

गेल्या तीन वर्षात कोल्हापूरच्या रस्ते विकासाला खऱ्या अर्थाने दिशा आणि गती लाभल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचे कारण म्हणजे राज्याच्या मंत्रीमंडळात कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने कणखर मंत्री लाभले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे महसूल या अतिमहत्वाच्या खात्याबरोबरच दुसरे महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाते आहे. यामुळेच गेल्या तीन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते सुधारणा, रुंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना विशेष प्राधान्य देऊन राज्य महामार्ग, जिल्हा व इतर मार्गावर 634 कोटीचा निधी विविध योजनांमधून खर्च करण्यात आला आहे. त्याद्वारे 714 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा केली आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात 39 पुलांची कामे हाती घेण्यात आली, त्यापैकी 15 कामे पूर्ण झाली असून 24 कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंचगंगा नदीवर राजाराम बंधारा- मोठा पुल बांधणे (18 कोटी )  आदमापूर गावाजवळ उड्डाणपूल  (18 कोटी ), रुकडी गावाजवळ पंचगंगा नदीवर मोठा पूल ( 12 कोटी ) अशा 8 पुलांचा समावेश आहे.

नियोजित रिंगरोड प्रकल्पाविषयी... 
कोल्हापूर शहरासभोवतालच्या जवळपास 23 गावांतून जाणाऱ्या ह्या रिंगरोडमध्ये 28 रस्त्यांचा अंतर्भाव करुन 88.529 कि. मी. निव्वळ लांबी 69.283 कि. मी. असा राज्यमार्ग क्र. 194 अ म्हणून रस्ते विकास योजना 2001-2021 मध्ये समावेश करण्यात आला आहे. या नियोजित रिंगरोडमुळे पुणे, मुंबई, बेळगांव, सांगलीकडून येणारी व रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, राधानगरीकडे मार्गस्थ होणारी वाहतूक तसेच रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, राधानगरीकडून येणारी व पुणे, मुंबई, बेळगांव, सांगलीकडे मार्गस्थ होणारी  वाहतुक ही कोल्हापूर शहरातून न जाता ती या नियोजित रिंगरोडवरुन जाणार आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील वाहतूकीची होणारी कोंडी दूर होऊन शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास तसेच वाहनांच्याही इंधन बचतीत मोलाची मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरास बाह्यवळण मार्ग अर्थात रिंगरोड तयार करण्यासाठीच्या राज्यमार्ग 194 अ साठी कोल्हापूर शहराभोवतीच्या 23 गावातील 28 रस्त्यांचा अंतर्भाव आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपापासून कणेरी, गिरगांव, नंदवाळ,  वाशी, महे, कोगे, कुडीत्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपीरे, यवलूज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागांव, मौजे वडगांव, हेर्ले, रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी  ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपाजवळ मिळणाऱ्या रस्त्यापर्यंत  एकूण 28 रस्त्यांचा अंतर्भाव असलेला या रिंगरोडच्या निर्माणाने कोल्हापूरच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com