उदयनराजेंना अटक न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

कोल्हापूर - कायदा सर्वांना सारखाच आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी "रोड शो' करूनही त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.

कोल्हापूर - कायदा सर्वांना सारखाच आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी "रोड शो' करूनही त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.

केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अंबाबाई मंदिरात पत्रकारांशी बोलत होते. मारहाण आणि खंडणीच्या आरोपाखाली खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. शुक्रवारी (ता. 21) उदयनराजे साताऱ्यात होते, हे माहीत असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली नाही, या प्रश्‍नावर गृह राज्यमंत्री केसरकर म्हणाले, 'याबाबत अद्याप आपल्याला काहीही माहिती नाही; मात्र हे जर खरे असेल तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करू.''

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेबाबत ते म्हणाले, 'अंबाबाई मंदिरात देशभरातून रोज लाखो भाविक येतात. येथील सुरक्षाव्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्थेबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला आहे. तो तातडीने मंजूर व्हावा, यासाठी पोलिस महासंचालकांशीही चर्चा करू. त्यांनी मंदिराच्या सुरक्षेबाबत सध्याच्या स्थितीची मंदिरात फिरून माहिती घेतली.

टीईटी परीक्षार्थींचा घेराव
दरम्यान, पूरस्थितीमुळे टीईटी परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांनी केसरकर यांना भवानी मंडप परिसरात घेराव घातला. पूरस्थितीमुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोचता आले नाही. यात आमचा काय दोष, असा सवाल उमेदवारांनी केला. यावर केसरकर म्हणाले, ""ही परीक्षा पुन्हा घेता येते का, यासंबंधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करू. परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांची व्यथा पावसाळी अधिवेशनात मांडू.''