‘टॉप वन’ खासदाराला साजेसे आदर्श  गाव करू - धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

कसबा तारळे - गावातील रस्ते चांदीचे व घरावरील कौले सोन्याची म्हणजे आदर्श गाव नव्हे, तर गावच्या सर्वांगीण विकासाच्या कामात सर्व गावकऱ्यांचा गट, तट, राजकारणविरहित सक्रिय सहभाग म्हणजेच आदर्श गाव होय. याच भावनेने सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून कसबा तारळे हे गाव आदर्श सांसद ग्राम करूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कसबा तारळे - गावातील रस्ते चांदीचे व घरावरील कौले सोन्याची म्हणजे आदर्श गाव नव्हे, तर गावच्या सर्वांगीण विकासाच्या कामात सर्व गावकऱ्यांचा गट, तट, राजकारणविरहित सक्रिय सहभाग म्हणजेच आदर्श गाव होय. याच भावनेने सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून कसबा तारळे हे गाव आदर्श सांसद ग्राम करूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

श्री. महाडिक यांनी चंदगड तालुक्‍यातील राजगोळी गाव गेल्या वर्षी आदर्श सांसद ग्राम म्हणून दत्तक घेतले. त्याच धर्तीवर राधानगरी तालुक्‍यातील कसबा तारळे गाव या वेळी दत्तक घेतले. गावचा साडेबारा कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजुरी कार्यक्रमात  श्री. महाडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वंदना पाटील होत्या.

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘शासनाच्या ११८ विभागांची विकासकामे या आराखड्याच्या माध्यमातून करता येतात. त्यासाठी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची फौज तयार आहे. या विकासात प्रत्येक नागरिकाचे योगदान हवे. त्यासाठी राजगोळीप्रमाणे प्रत्येक विकासकामाची स्वतंत्रपणे जबाबदारी घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी विविध गट करा. तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट या सर्वांना सक्रिय करा. विकासकामांना बालसंस्कार वर्ग, व्याख्याने, योगवर्ग आदींचीही जोड द्या. तुमचा खासदार हा देशातील टॉप वन खासदार आहे. या लौकिकाला शोभेल असे कसबा तारळे हे आदर्श गाव करूया.’’ ‘भोगावती’चे माजी संचालक शिवाजीराव पाटील, सोनम जाधव यांची भाषणे झाली.

भोगावती साखर कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील यांनी स्वागत व माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

या वेळी गटविकास अधिकारी एच. डी. नाईक यांनी विकास आराखड्याचे वाचन केले. जिल्हा बॅंकेचे संचालक ए. वाय. पाटील, सभापती दिलीप कांबळे, माजी सभापती संजय कलिकते, जयसिंग खामकर, पांडुरंग भांदिगरे, दीपाली दीपक पाटील, राजू भाटले, बबन महाडिक, महेश निल्ले, दत्तात्रय पाटील, उपसरपंच लक्ष्मण शिऊडकर, व्ही. टी. जाधव, महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील, अशोक पाटील यांच्यासह सदस्य, शासकीय अधिकारी उपस्थित होते. सुनील कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी एस. एस. पाटील यांनी आभार मानले.