कलेक्‍टरसाहेब, बरं झालं तुम्ही बोलला!

कलेक्‍टरसाहेब, बरं झालं तुम्ही बोलला!

कोल्हापूर - ‘उठसूठ आंदोलनामुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसली आहे. दररोज कोणीही उठतो आणि आंदोलन करतो, हे चित्र चुकीचा संदेश देणारे आहे,’ असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले. जणू काही ते कोल्हापूरवासीयांच्या मनातलेच बोलले. ते जे बोलले ते जरूर खरे आहे. क्षणभर कोल्हापूरचा विकास हा मुद्दा बाजूला राहू दे; पण उठसूठ आंदोलनामुळे कोल्हापूरच्या जिगरबाज चळवळीला आणि त्या चळवळीतून उभ्या राहणाऱ्या खऱ्या आंदोलनालाही खीळ बसत आहे. 

आंदोलन हा लोकशाहीतला हक्‍क आहे. कोल्हापूरकरांनी हा हक्‍क जिद्दीने जपला. किंबहुना या आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी भल्याभल्यांचा माज उतरवला. अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा धसका घेतला. सत्तारूढ राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून केवळ आंदोलनाच्या बळावर कोल्हापुरातून टोल घालवला.

टोल हे केवळ अलीकडचे एक ताजे उदाहरण; पण यापूर्वी आंदोलन या शब्दाचा आब कार्यकर्त्यांनी निष्ठेने जपला. उठसूठ आंदोलन करायचे नाही आणि एकदा पूर्ण विचारांती आंदोलन हाती घेतले, की त्यातून कदापि माघार नाही. हा मंत्र तंतोतंत पाळला. त्यामुळे महागाईविरोधात १९६७ रोजी कोल्हापुरात झालेल्या आंदोलनात सात जणांचा गोळीबारात मृत्यू झाला तरी आंदोलनाचा जोर पुढे कायम राहिला.

रिक्षाचालकांनी १९८० रोजी खराब रस्त्यांसाठी आंदोलन केले. आख्या महापालिका प्रशासनाला रिक्षाचालकांनी जेरीस आणले आणि त्यानंतर शहरात युद्ध पातळीवर नवीन डांबरी रस्ते करण्याचे काम सुरू झाले. एका उद्योगपतीच्या मुलाने बालिकेवर बलात्कार केला. त्यापुढे जाऊन त्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. सारे कोल्हापूर त्या बालिकेसाठी एक झाले आणि त्या नराधमाला तुरुंगात पाठवले.

शाहूपुरी पोलिस कोठडीत पोलिस मारहाणीत अरुण पांडव या गरीब तरुणाचा मृत्यू झाला. त्या वेळीही सारे शहर एक झाले. आंदोलन सुरू झाले. सहा पोलिसांना जन्मठेप झाल्यावरच आंदोलन थांबले. 

हजारो लिटर तूप, तीळ, मोदक यांचे हवन करत विश्‍वशांती व यज्ञाचे कोल्हापुरात २००८ मध्ये नियोजन झाले. त्या वेळीही सारे कोल्हापूर एकत्र झाले. यज्ञ पेटवून देण्यात कोल्हापूरकर यशस्वी झाले; पण आता हे खरे आहे, की काही ठराविक जण टारगेट ठरवून आंदोलन करू लागले आहेत.

आंदोलन शब्दाची ताकद कमी 
काही जण केवळ फोटोसाठी आंदोलन करतात. काही जण केवळ आंदोलनाचा, न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात पटाईत झाले आहेत. त्यामुळे आंदोलन कसे मिटवायचे, हेही काही अधिकाऱ्यांना कळू लागले आहे. यातून आंदोलन शब्दाची ताकद कमी झाली आहे आणि त्याहीपेक्षा चळवळीचे गाव म्हणून राज्यात वेगळी ओळख असलेल्या कोल्हापूरचे नाव काहींच्‍या उठसूठ आंदोलनामुळे खराब झाले आहे.

ठळक आंदोलने

  •  १९६७ रोजी कोल्हापुरातील आंदोलनात 
  • सात जणांचा गोळीबारात मृत्यू
  •  १९८० मध्ये रिक्षाचालकांच्या 
  • आंदोलनाने प्रशासन जेरीस
  •  बलात्कार प्रकरण दडपणाऱ्यास तुरुंगवास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com