महाराष्ट्र एकिकरण समितीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा

महाराष्ट्र एकिकरण समितीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा

कोल्हापूर - सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकाकमधील कार्यक्रमात कर्नाटक स्तुतीपर कन्नड गीत गायल्याच्या निषेधार्थ त्यांच्या घरावर आज आयोजित केलेला मोर्चा पोलिसानी संभाजीनगर मोरे कॉलनी येथे रोखले.

निषेधाच्या घोषणा देत पोलिसांचे कडे तोडुन पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते व पोलिस यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. 

कर्नाटकातील गोकाकमधील एका जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी "कर्नाटकातच जन्म घ्यावा..' अशा आशयाचे कन्नड गीत गायले होते. याचे तीव्र पडसाद प्रतिक्रिया सीमाभागातील मराठी जनतेत उमटले. समन्वयक मंत्र्यांनीच केलेल्या या कन्नड वक्तव्याने सीमाप्रश्‍नी मराठी भाषिकांची गळचेपी आणखी वाढणार आहे अशा प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ लागल्या.

याबाबत  सीमाप्रश्न समन्वयक मंत्री पाटील यांचा निषेध करण्यासठी व त्यांनी दिलगीरी व्यक्त करावी या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागातील कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या मोरे कॉलनीतील घराकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड पोलिस बंदोबस्त लावला होता. ठिकठिकाणी रस्ते अडविण्यात आले होते.

सकाळी साडे अकराच्या सुमारास कार्यकर्ते संभाजीनगर चौकात दाखल झाले. घोषणा देत त्यांनी मोर्चाला सुरुवात केली. संभाजीनगर बसस्थानकापर्यंत कार्यकर्ते मोर्चा आल्यानंतर पोलिस प्रमुख संजय मोहिते यांनी आलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. " मी तुमच्या स्वागतासाठी आलोय, आपले सीमाभागातुन शिक्षण झाले आहे, त्यामुळे मीही तुमच्यातीलच एक आहे,' असे सांगत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला दिला.

काळे झेंडे घेऊन आणि डोक्‍याला काळे कपडे बांधून आलेले कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या घराच्या दिशेने जाऊ लागले. मोरे कॉलनीत जाणाऱ्या रस्त्यावर मोर्चा पोलिसांनी अडविला. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत मूक निदर्शने करण्याचा आग्रह धरला. यावरुन पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी झाली.

माजी महापाैर, उपमहापाैरांची पोलिसांना विनवणी

मंत्र्यांच्या घरापर्यंत जाण्यास बंदी घालणारे आम्हाला महाराष्ट्रात येवु देणार काय,

- सरिता पाटील, माजी महापौर, बेळगाव

कर्नाटक पोलिस आम्हाला बोलुुही देत नाहीत. त्यांच्या काठ्या आमच्यावर चालत असतात. तुम्ही महाराष्ट्रातील पोलिसांनी आम्हाला आपले समजा. आम्ही घरातील कर्त्या माणसांसमोर आमचे गाऱ्हाणे मांडण्यास आलोय. 

- रेणु किल्लेकर,  माजी उपमहापौर, बेळगाव  

जिल्हा पोलिस प्रमुख मोहिते यांनी अनेकदा आंदोलकांना आहे त्याच ठिकाणी निदर्शने करण्याची विनंती केली. पण आंदोलक तोंडावर काळया पट्ट्या बांधून घरापर्यंत जाण्याच्या भुमिककेवर ठाम राहिले. पोलिस निवासस्थानाकडे जाऊ देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आक्रमक झालेल्या एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडुन घुसण्याचा प्रयत्त्न केला. त्यावर बळाचा वापर करुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर माजी महापौर सरिता पाटील, रेणु किल्लेकर, मदन बामणे यांनी रस्त्यावर ठाण मांडुन "रहेंगे तो महाराष्ट्र मे, नहीं तो जेलमे', अशा घोषणा दिल्या. रस्त्यावर बसलेल्या या कार्यकर्त्यांना पोलिसानी उचलुन पोलिस व्हॅनमध्ये बसवले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली.

या आंदोलनात महाराष्ट्र एकीकरण समितीचे मदन बामणे, रत्नप्रसाद पवार, मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर, अॅड अमर यळ्ळुरकर, प्रशांत नाईक, हर्ष मुतकेकर, श्रीकांत कदम, सुनिल बाळेकुंद्री, सागर कुंभार, संजय देसाई, निपाणीचे नगरसेवक संजय सांगावकर, दिपक शेटके, नवनाथ चव्हाण, पियुुष हावळ, रवि निर्मळकर, राजु मरवे आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com