कोल्हापूर जिल्ह्यात दहा आमदार, दोन खासदार राष्ट्रवादीचेच - अजित पवार

कोल्हापूर जिल्ह्यात दहा आमदार, दोन खासदार राष्ट्रवादीचेच - अजित पवार

कोल्हापूर - राज्यात मुदतपूर्व किंवा मुदतीनंतर निवडणूक लागू दे, कोल्हापूर जिल्ह्यात दहा आमदार आणि दोन खासदार हे राष्ट्रवादीचेच असतील, असे नियोजन केले जाईल. यासाठी पक्षाची जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारिणी तयार करा. जात-धर्म, आमदार, खासदाराचा नातलग न पाहता तसेच बदनाम नसणाऱ्या सर्वसामान्य तरुणांची ‘कर्तबगारी’ पाहूनच त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत अध्यक्ष-उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचे आदेश आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. तीन तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या या मेळाव्यात श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली. श्री. पवार म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत. मोदी लाट असो किंवा आणखी कोणतेही वादळ असो, याठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालेले आहे. भाजपने केवळ दमदार जाहिरातबाजी आणि सोशल मीडियाचा वापर करत सत्ता काबीज केली आहे.

आजही तरुणांची सर्वाधिक फळी राष्ट्रवादीकडे असतानाही या सर्वापर्यंत भाजप पोचला आहे. आता हे बदलायला हवे, चांगल्या आणि कर्तबगार कार्यकर्त्यालाच राष्ट्रवादीत पदाधिकारी म्हणून संधी दिली जाईल. गाव तेथे राष्ट्रवादी आणि घर तेथे राष्ट्रवादीचा झेंडा ही मोहीम राबविली जाईल. लेटर हेडवर नाव छापण्यापुरते आणि स्वत:ची कामे करून घेण्यापुरतेच असणाऱ्याला राष्ट्रवादीचे पद देऊ नका. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचून सर्वसामान्य माणसांच्या समस्या आणि अडचणी सोडविल्या पाहिजेत. यातूनच भविष्यात जिल्ह्यात दहा आमदार व दोन खासदार हे राष्ट्रवादीचेच असतील. यासाठी पूर्ण ताकद लावली जाईल.  

 सुनील तटकरे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेला पक्ष आहे. पक्षाचे २३ विविध सेल आहेत. प्रत्येक तालुक्‍यात कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी केली जाणार आहे. युवक अध्यक्ष ३२ वर्षांचा असावा. विद्यार्थी सेलमध्ये २५ ते २६ वर्षांचा अध्यक्ष व उपाध्यक्ष नियुक्त करावा. तसेच महिलांनाही संधी दिली जावी.’’ या वेळी आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, भैया माने, नितीन पाटील, अवधूत अपराध आदी उपस्थित होते.

शरद पवारांचा आदर्श घ्या
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ७७ वर्षांचे असतानाही त्यांच्या कामाचा आदर्श तरुणांनीही घेण्यासारखा आहे. त्यांच्या कामाची पद्धत आणि नियोजन हे सर्व थरापर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करायचे असल्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. 
 

‘ते’ प्रत्येकालाच विचारतात...
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बसल्या बैठकीला प्रत्येकाला भाजपमध्ये या म्हणतात. त्यांचे किती मनावर घ्यायचे, असे सांगत पवार यांनी कोल्हापुरात कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

स्वतंत्रपणेच कामाला लागा
सध्या तरी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, पंचायत समिती निवडणुका पक्षाच्या पातळीवरच लढायच्या आहेत. भविष्यात कोणाशी युती करायची, हा निर्णय शरद पवार आणि राष्ट्रीय कार्यकारिणी घेईल; पण सध्या तरी कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणेच कामाला लागले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com