शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना अक्षयकुमारकडून प्रत्येकी २५ हजार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - अभिनेता अक्षयकुमार याने १०३ शहीद पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला २५ हजारांचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली. त्यापैकी ३९ धनादेशांचे वितरण जिल्ह्यात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन धनादेशाचे वितरण करण्यात आले. 

कसबा बावडा येथील करवीर पोलिस पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत असताना दिलीप संकपाळ यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या घरी पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली व अक्षयकुमारने पाठवलेला धनादेश त्यांच्या कुटुंबीयांकडे दिला. त्याच वेळी अक्षयकुमारने स्वतःच्या स्वाक्षरीने पाठवलेले पत्रही वाचून दाखवले. यावेळी त्यांची पत्नी सुभद्रा संकपाळ, आई इंदूबाई संकपाळ, मुलगी श्‍वेता आदी उपस्थित होते. 

लाईन बाजार येथील सुरेश विठ्ठल जाधव यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला. त्यातच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्याही घरी पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन नातेवाईकांना धनादेश दिला. अक्षयकुमार याच्या पत्राचे वाचनही केले. या वेळी त्यांची पत्नी रूपाली जाधव, आई हौसाबाई, मुलगा स्नेहल व प्रतीक उपस्थित होते. स्नेहलशी अक्षयकुमार याने स्वतः दूरध्वनीवरून संवाद साधला. 

अक्षयकुमारच्या पत्रातील आशय
आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दुःख अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्याो प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा. ही माझी नम्र विनंती. सदैव आपल्या ऋणात असणारा 
 
आपला

 - अक्षयकुमार