मंडप ठरताहेत रुग्णवाहिकेसाठी विघ्न

मंडप ठरताहेत रुग्णवाहिकेसाठी विघ्न

राजारामपुरीतील स्थिती - डॉक्‍टरांसह वाहनधारकांतून नाराजी, पोलिसांनी टाकली नांगी
कोल्हापूर - विघ्नहर्त्यांसाठी रस्त्यातच उभारलेले मंडळांचे मंडपच रुग्णवाहिकेसाठी विघ्न ठरले आहेत. राजारामपुरीतील भव्य मंडपांमुळे रस्त्यावरून रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नाही. काही डॉक्‍टरांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी पंगा न घेता रुग्णांना "डिस्चार्ज' देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. काही डॉक्‍टर गणेशोत्सव काळात हॉस्पिटल बंद ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर मंडपांच्या आकारावर बंधन घालणे निश्‍चितच शक्‍य झाले असते.

गणेशोत्सवानिमित्त राजारामपुरीत मंडळांनी मंडप उभारले आहेत. त्याचा आकार इतका मोठा की, त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. राजारामपुरी म्हणजे "मेडिकल हब' समजले जाते. तेथे पन्नासहून अधिक हॉस्पिटल आहेत. याच परिसरात लॅबोरेटरीज्‌ आहेत.

त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मंडळांनी आठवडाभर अगोदरच उभ्या केलेल्या भव्य मंडपांमुळे हॉस्पिटल आणि लॅबोरेटरीमध्ये जाणे रुग्णांना सहजासहजी शक्‍य होत नाही. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांचे मंडप रस्त्यावर थाटण्यास कोणाची फारशी हरकत नसते. सर्वांच्या आनंदात भर घालणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. मात्र तो आनंदात भर घालण्यापेक्षा विघ्न निर्माण करणारा सण ठरत आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भव्य मंडप उभा करून आपले वेगळेपण दाखविण्यापेक्षा सामाजिक काम करून मंडळाच्या नावाचा लौकिक वाढवला तर ते नक्कीच फायद्याचे ठरेल. मात्र भव्य मंडप उभा करून वाहनधारकांची कुचंबणा करणे कितपत योग्य आहे ?

मंडळांतील कार्यकर्त्यांची संख्या कमीत कमी 50-100 पर्यंत आहे. त्यांचा परिसरात रोजचा वावर असतो. त्यांच्याशी पंगा घेण्यापेक्षा जे आहे ते सहन करणे हेच योग्य समजले जात आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करणे आवश्‍यक आहे. विशेष म्हणजे मंडपासाठी ठराविक जागाच निश्‍चित झाली पाहिजे. यासाठी तेथे पोलिसांचे लक्ष आवश्‍यक आहे. मात्र मंडळांसमोर पोलिसांनीही नांगी टाकल्याचे उदाहरण राजारामपुरी हद्दीत दिसून येते.

अजूनही वेळ गेलेली नाही
पोलिसांकडून अपुरे पडलेले प्रबोधन आणि मंडळांतील कार्यकर्त्यांची मनमानी यामुळे सर्वसामान्य मात्र वेठीस धरले जात आहेत. गणेशागमनासाठी अद्याप काही अवधी आहे. दरम्यानच्या काळात आजही मंडपांचा आकार कमी करणे, किमान रुग्णवाहिका पुढे जाऊ शकेल यासाठी पोलिस, महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा काही डॉक्‍टरांना त्यांचे हॉस्पिटल गणेशोत्सव काळात बंद ठेवावे लागणार असल्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com