चला, एप्रिल फूल नको, ‘कूल’ करू!

Tree-Plantation
Tree-Plantation

कोल्हापूर - ‘एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया...’ असा वेडेपणा जपत उद्या (ता. १) सर्वत्र नवआर्थिक वर्षाबरोबरच एप्रिल फूलची धूम असेल. मात्र ‘एप्रिल फूल करण्यापेक्षा एप्रिल ‘कूल’ करूया...’ असे आवाहन गेले १५ दिवस सोशल मीडियावरून केले जात आहे. पुढचा एप्रिल ‘कूल’ करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे आणि ते जगवावे, अशा आशयाच्या पोस्टस्‌ सर्वत्र व्हायरल झाल्या आहेत. 

काय करता येईल..?
सोशल मीडियावरून आवाहन केले जात असले, तरी प्रत्यक्षात मार्चमध्ये झाडे लावली तर ती कितपत जगतील, असेही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मात्र बिया संकलन करून या मोहिमेत सहभागी होता येते. पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संस्थेसह विविध संस्थांनी नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला आहे. यंदाही बिया संकलन केले जाईल. या सर्व घटकांच्या संघटित प्रयत्नांतून जांभूळ, बेल, शिकेकाई, ऐन, कडुनिंब, किंजळ, शमी, आपटा, बहावा, कांचन, जारूळ, पारिजातक आदी बियांचे संकलन केले जाते. उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्यांना या बिया कशा रुजवाव्यात, त्यांच्यापासून रोपटी कशी तयार करावीत, याची माहिती दिली जाते. 

उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी उपक्रमात सक्रिय सहभागी होतात. संकलित झालेल्या बिया सामाजिक वनीकरण विभागाकडे दिल्या जातात. तेथे बिया रुजवून त्याची रोपे तयार केली जातात. दैनंदिन भ्रमंतीबरोबरच पदभ्रमंती, गड-किल्ले भ्रमंती आणि विविध शिबिरांसाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्या-त्या परिसरातील विविध झाडांच्या बिया संकलित करूनही अशा उपक्रमात सक्रिय सहभागी होता येते.

बिया संकलन करताना...
बियांचे संकलन करताना त्या ताज्या असाव्यात

पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या, तसेच पोपट,व माकड यांनी खाल्लेल्या फळांच्या बियांचेही संकलन करावे

ओल्या स्वरूपात मिळणाऱ्या बिया उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात

पर्यटनासाठी गेल्यानंतर तेथील विविध झाडांच्या बियाही संकलित करता येतील

काय आहे ‘एप्रिल फुल’ ?
काही देशांमध्ये मार्च हा महिना आर्थिक घडामोडींचा शेवटचा महिना असल्याने अनेक कामे या महिन्यात पूर्ण केली जातात. त्या वेळी कामात गुंतलेले कर्मचारी प्रचंड थकतात. त्यांचा थकवा घालविण्यासाठी काहीतरी विरंगुळा करावा, यासाठी ही प्रथा रूढ झाली.

फ्रान्सने ग्रेगरियन कॅलेंडर अमान्य केल्याने युरोपात त्यांना फुल्स म्हणून चिडवले गेले. त्याचे निमित्त साधून १ एप्रिल म्हणजे ‘एप्रिल फुल’ असे समीकरण तयार झाले.

जोसेफ बास्कीन या इतिहास प्राध्यापकाच्या मतानुसार काँस्टंटाइन या साम्राज्याच्या राजाच्या दरबारातील काही विदूषकांनी राज्यकारभारावरून डिवचले होते. त्यामुळे राजाने त्यांना एका दिवसाकरिता राज्यकारभार करण्याची संधी दिली. या विदूषकांनी मूर्खपणाचे अनेक आदेश दिले. तेव्हापासून ही प्रथा रूढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com