गडहिंग्लज विभागात भातावर लष्करी अळी

गडहिंग्लज विभागात भातावर लष्करी अळी

गडहिंग्लज - गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्‍यांतील भात क्षेत्रावर ठिकठिकाणी लष्करी अळीचा हल्ला झाला आहे. शेतकऱ्यांनी या किडीचे वेळीच नियंत्रण करण्याची गरज आहे. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या अळीमुळे शेकडो एकर क्षेत्रातील भातपीक धोक्‍यात आल्याचे सांगण्यात येते. 

कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कृषी पर्यवेक्षकांना निरीक्षणावेळी या किडीचा प्रादुर्भाव लक्षात आला आहे. लष्करासारखे सामूहिक हल्ला करण्याचे तंत्र या अळीचे आहे. ही कीड वेगवेगळ्या प्रकारच्या गवतावर जगते. एखाद्या शेतातील या अळीचे अन्न संपते, त्यावेळी ती लगेचच शेजारच्या क्षेत्रावर हल्ला करते. दिवसा ही कीड चुडामध्ये लपून बसते. या अळीची अवस्था २० ते २५ दिवसांपर्यंत राहते. त्याची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात. 

ही अळी भाताचे कोणत्याही अवस्थेत नुकसान करते. अधिकाधिक भाताच्या लोंब्या किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेतच जास्त नुकसान करते. ही अळी रोपावर चढून लोंबी कुरतडते किंवा कापून टाकते. त्यामुळे अळीस लोंबी कुरतडणारी अळी असेही म्हणतात. लोंबी कुरतडून टाकल्याचे दिसताच भाताच्या चुडामध्ये बारकाईने लक्ष दिल्यास ही अळी चुडात लपून बसल्याचे दिसेल. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी किडनाशके फवारावीत. फवारणी करताना नाकातोंडाला मास्क अगर कापड बांधावे. हातमोजे वापरावेत. अंगात ॲप्रन घालावा. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. फवारणी झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. जेणेकरून कोणतीही विषबाधा होणार नाही.

पक्व भात कापण्याचे आवाहन
अळीपासून भाताचे नुकसान टाळण्यासाठी पक्वतेचे भात तत्काळ कापून मळणी करून घ्यावी. दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास भात खाचरातील पाणी पूर्णपणे काढून पिकात भांगे पाडून चुडाच्या बुंध्यामध्ये क्‍लोरोपायरीफॉस ५० ईसी ३० मिलि किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी ५ मिलि किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूईसी २८ मिलि १० लिटर पाण्यातून फवारावे किंवा चुडात आळवणी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com