लाच घेताना सहायक आयुक्त जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कराच्या नोटिसीबाबत मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना वस्तू व सेवा कर विभागाचा सहायक आयुक्त (वर्ग १) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सहायक कर आयुक्त संजय नारायण माने (वय ५०, उजळाईवाडी, ता. करवीर) असे त्या संशयिताचे नाव आहे. वस्तू व सेवा कर भवनातच पथकाने ही कारवाई केली. वस्तू व सेवा कर सुरू (जीएसटी) झाल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी पत्रकारांना सांगितले.

कोल्हापूर - कराच्या नोटिसीबाबत मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना वस्तू व सेवा कर विभागाचा सहायक आयुक्त (वर्ग १) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सहायक कर आयुक्त संजय नारायण माने (वय ५०, उजळाईवाडी, ता. करवीर) असे त्या संशयिताचे नाव आहे. वस्तू व सेवा कर भवनातच पथकाने ही कारवाई केली. वस्तू व सेवा कर सुरू (जीएसटी) झाल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी पत्रकारांना सांगितले.

व्यावसायिक नईम अब्दुलशकुर कच्छी (रा. जवाहरनगर) यांनी आलिशान मोटार २०१०-११ मध्ये विक्री केली होती. त्यावेळी त्यांनी त्याचा विक्रीकर भरलेला नव्हता. तो कर भरण्याबाबत वस्तू व सेवा कर विभागाने त्यांना नोटीस काढली. 

तो कर कच्छी यांनी भरला नाही म्हणून त्यांना विभागाने एक लाख रुपये कर, त्यावर एक लाख रुपये दंड व ५६ हजार २५० रुपये व्याज अशी एकूण २ लाख ५६ हजार २५० रुपये भरण्याची दुसरी नोटीस काढली. त्या नोटीसला कच्छी यांनी खुलासा तयार करून तो सहायक कर आयुक्त संजय मानेला भेटून दिला. मात्र त्यावेळी माने याने त्यांना हा खुलासा अपीलात जाऊन द्या, असे सांगितले. यानंतर केंद्र सरकारने ‘ॲमिनेस्टी स्किम’ (कराच्या दंड व्याजात सवलत देणारी योजना) आणली. त्या योजनेनुसार विभागाने कच्छी यांना लावलेला दंड व व्याज माफ केले. त्यानुसार कच्छी यांनी कराचे एक लाख रुपये भरले. त्यावेळी माने याने त्यांना तुझ्या मोटारीचा विक्री कर मी कमी करून दिला आहे. त्याकरिता ५० हजार रुपये दे, अशी मागणी केली. मात्र कच्छी यांनी त्याला पैसे दिले नाहीत. 

तक्रारदार कच्छी हे स्क्रॅपचा व्यवसाय करतात. त्यांनी २०१२ मध्ये ‘सहारा ट्रेडर्स’ या कंपनीला स्क्रॅपचा माल विकला होता. केलेल्या विक्रीबाबतचा साडेतीन लाखांचा कर त्यांनी विक्रीकर विभागाला भरला होता. परंतु संबंधित कंपनीने त्यांना खरेदी केलेल्या मालाची रक्कम दिली नाही. त्यामुळे कच्छी यांनी विक्री केलेला माल त्या कंपनीकडून परत घेतला; परंतु त्या कंपनीने परत दिलेल्या मालाचा कर भरला नाही. म्हणून विभागाने कच्छी यांना या मालासंबधी ३ लाख १५ हजार ८१६ रुपये कर भरण्याबाबतची २०१६ ला नोटीस काढली. पंधरा दिवसांपूर्वी कच्छी यांनी वस्तू व सेवा कर भवनात जाऊन याबाबतची वस्तुस्थिती मानेला सांगितली. त्यावेळी मानेने ‘तू प्रथम मागील गाडी विक्रीचे व्यवहारातील ५० हजार रुपये लाच दे. त्यानंतर तुला सदरप्रकरणी काय करायचे ते सांगून तुला मदत करतो’ असे कच्छी यांना सांगितले. त्यानंतर तो कच्छी यांना वारंवार फोन करून ५० हजार रुपयांची मागणी करू लागला. त्यानंतर तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची रक्कम ठरली. 

याबाबत कच्छी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १९ सप्टेंबरला तक्रार अर्ज दिला. त्यानुसार विभागाने त्याची पडताळणी केली. त्यानुसार आज दुपारी विभागाने सापळा रचला. वस्तू व सेवा कर भवनात कच्छी यांच्याकडून २० हजारांची लाच घेताना संजय माने याला पथकाने रंगेहाथ पकडले. वस्तू व सेवा कर (जीएसटी) सुरू झाल्यानंतर या विभागातील ही पहिली कारवाई ठरली. ही कारवाई गोडे यांच्यासह पोलिस कर्मचारी श्रीधर सावंत, मनोज खोत, संदीप पावलेकर, शरद पोरे यांनी केली. 

चार महिन्यांत दहावी कारवाई
चार महिन्यांपूर्वी पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी पद्‌भार स्वीकारला. त्यानंतरची ही दहावी कारवाई होय. यापूर्वी पोलिस ठाण्यातच लाच घेणाऱ्या पोलिसांना गोडे यांनी पकडले.