कोल्हापूरच्या एजंटावर हल्ल्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  दुचाकी खरेदीच्या व्यवहारातून कोल्हापूरच्या मोटार विक्री एजंटावर पाठलाग करून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार निपाणीत घडला. दरम्यान, आलिशान मोटारीवर गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने कोल्हापूर व निपाणी पोलिसांची धावपळ उडाली;

कोल्हापूर -  दुचाकी खरेदीच्या व्यवहारातून कोल्हापूरच्या मोटार विक्री एजंटावर पाठलाग करून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार निपाणीत घडला. दरम्यान, आलिशान मोटारीवर गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने कोल्हापूर व निपाणी पोलिसांची धावपळ उडाली; मात्र गोळीबाराची कोणतीही घटना रात्री उशिरापर्यंत उघडकीस आली नाही. त्याबाबत पोलिसात कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, निपाणीत कोल्हापूर वेशीवरील पुलाजवळ कोल्हापुरातील मोटार खरेदी-विक्री करणारा एक एजंट दुचाकी खरेदीसाठी गेला होता. दुचाकी विक्री करणारा व एजंट यांच्यात बोलणी सुरू होती. दुचाकी मालकाने याबद्दलची माहिती आपल्या एका सहकाऱ्याला दिली. तो सहकारी तेथे येईपर्यंत कोल्हापूरचा एजंट एका सहकाऱ्यासह मोटारीतून कोल्हापूरच्या दिशेने निघाला. त्यांचा पाठलाग दुचाकी मालक व त्याच्या सहकाऱ्याने सुरू केला. एजंटची मोटार कोगनोळी टोल नाक्‍यावर आली असता पाठलाग करणाऱ्यांनीही त्याच्या मोटारीला गाठले. त्या वेळी टोल नाक्‍याजवळ त्यांच्यात वादावादी झाली. एजंट मोटारीतून बाहेर येत नाही हे पाहून पाठलाग करणाऱ्या दोघांनी मोटारीची तोडफोड सुरू केली. या झटापटीतच एजंट कोल्हापूरच्या दिशेने मोटारीसह पसार झाला. या दरम्यान गोळीबार झाल्याची अफवा उठली; मात्र प्रत्यक्षात तसे काहीही झाले नसल्याचे निपाणी पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, कोल्हापुरात पोचलेल्या एजंटने आमच्यावर कोगनोळी नाक्‍याजवळ गोळीबार झाला असून आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात केली. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी, गुन्हा निपाणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे, तेथे जाऊन तक्रार द्यावी लागेल, त्यासाठी आवश्‍यक सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी दाखवली. पण त्या तरुणांनी निपाणीस जाण्यास नकार दिला. त्यांची अनेकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दोघांची सखोल चौकशी केली असता, गोळीबार झाला नसल्याचे व तोडफोड झाल्याचे पुढे आले.