ऑनलाईन व्यवहार करताय; सावधान! गोपनीयता ठेवाच...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ऑनलाईन व्यवहार करताय? सावधान! तुमचा मोबाईल हॅंडसेट बिघडलाय की तुमची फसवणूक होत आहे, याची खात्री करा. अन्यथा तुमच्या बनावट सिमकार्डवरून पासवर्ड, ओटीपी क्रमांकासह इतर माहिती मिळवून त्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. शहरात अशा पद्धतीने सव्वा कोटींची फसवणूक झाली आहे.

कोल्हापूर - ऑनलाईन व्यवहार करताय? सावधान! तुमचा मोबाईल हॅंडसेट बिघडलाय की तुमची फसवणूक होत आहे, याची खात्री करा. अन्यथा तुमच्या बनावट सिमकार्डवरून पासवर्ड, ओटीपी क्रमांकासह इतर माहिती मिळवून त्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. शहरात अशा पद्धतीने सव्वा कोटींची फसवणूक झाली आहे.

तुमच्याकडील मोबाईलमध्ये युजर क्रमांकाबरोबरच इतर माहिती सेव्ह केलेली असते. किंबहुना तुमचा रजिस्टर मोबाईल हा तुमचा महत्त्वाचा पासवर्ड ठरू शकतो. तुमच्या बॅंकेतील अकाऊंटला तुम्ही रेफरन्स म्हणून मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्या क्रमांकावरून तुम्हाला तुमच्या अकाउंटवरील बॅलन्स लगेच समजतो. तुम्ही इंटरनेटदारे ऑनलाईन व्यवहार करतानाही तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येतो. त्यावरून तुम्हीच तुमचे अकाऊंट हाताळता, हे निश्‍चित होते. मात्र, तुमच्या मोबाईलचे सीमकार्डच बंद झाले आहे म्हणून दुसरे मिळविले तर तुमच्या मोबाईलचे सर्व व्यवहार इतरांच्या हाती जाऊ शकतात. तुमचा क्रमांक रजिस्टर असल्याने ज्याकडे दुसरे (डुप्लिकेट) कार्ड असेल त्याच्याकडे सर्व व्यवहार जाऊ शकतात.

उदाहरणार्थ तुमचे मोबाईलचे सीमकार्ड बंद पडले आहे, असे सांगून दुसऱ्या व्यक्तीने तुमचे सीमकार्ड मिळविले. त्यासाठी तुमच्याकडील आधारकार्डसह इतर माहिती कंपनीत दिली. तुमच्याकडील आधारकार्डसह इतर माहिती मिळवून हा व्यवहार केला. त्यानंतर संबंधिताला मिळणारे सीमकार्ड तुमच्या नावे असेल; पण ते तुमचे असणार नाही. तुमचे कार्ड बंद पडल्यावर तुम्ही कंपनीला कॉल केल्यानंतर कार्ड सुरू आहे, हॅंडसेट खराब असेल, असे सांगितले जाते. तुम्ही हॅंडसेट दुरुस्तीसाठी प्रयत्न करता.

दरम्यानच्या काळात संबंधित व्यक्ती तुमच्या अकाउंटवर मिस कॉल देऊन सर्व माहिती मिळवू शकतो. त्याद्वारे तो ‘ओटीपी’चा वापर करू शकतो. त्यातून तुमच्या अकाउंटमधील आवश्‍यक तितकी रक्कम काढू शकतो. अशा पद्धतीने तुमची फसवणूक होऊ शकते.

पूर्वी केवळ पासवर्डच गोपनीय ठेवणे आवश्‍यक होते. मात्र, आता युजर आयडीही गोपनीय ठेवणे आवश्‍यक आहे. मोबाईल क्रमांकावरून ‘ओटीपी’ मिळू शकतो. त्यामुळे मोबाईल हॅंडसेटही इतरांच्या हाती देणे धोक्‍याचे आहे. मोबाईल हा व्यवहाराशी जोडला गेला असल्याने त्याची सुरक्षा आणि गोपनीयता आता ऑनलाईन व्यवहारात महत्त्वाची आहे. त्याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्‍यक आहे.
- सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक

फसवणूक टाळण्यासाठी...

-  तुमच्याकडील पासवर्डसह युजर आयडी कोणालाही सांगू नका.
- बॅंकेत रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक इतरांकडे देऊ नका.
-  सिमकार्ड बंद पडल्यास शक्‍य तितक्‍या लवकर कंपनीत व्यवहार थांबविण्यास सांगा
- संबंधित कंपनीत ई-मेलद्वारे सिमकार्ड बंद पडल्याची माहिती द्या
 - सिमकार्ड बंद पडल्यास विनाविलंब दुसरे सिमकार्ड मिळवा
 - पहिले सीमकार्ड हरविल्यास तातडीने त्याचे व्यवहार बंद करा, कंपनीत माहिती द्या
 - ओटीपी, पासवर्ड हे क्रमांक शक्‍यतो सीमकार्डमध्ये सेव्ह करू नका
 - रेफरन्स मोबाईल क्रमांक, पासवर्ड, युजर आयडीची माहिती कोणालाही होऊ देऊ नका
 

Web Title: kolhapur news Be careful! Keep Privacy in Online transactions