सण, समारंभांत फुलांच्या रांगोळीचे आकर्षण

सण, समारंभांत फुलांच्या रांगोळीचे आकर्षण

कोल्हापूर -  बदलत्या ट्रेण्डनुसार रांगोळीत वैविध्य आणण्यासाठी फुलांच्या रांगोळीची संकल्पना पुढे आली. मोठमोठ्या इव्हेंटसमधील फुलांच्या रांगोळीचे आकर्षण पारंपरिक सण-समारंभांतही दिसू लागले आहे. फुलांच्या पाकळ्या, पाने, फुले अशा घटकांमुळे ही रांगोळी इकोफ्रेंडली होते. समारंभ संपल्यानंतर या फुलांचा सेंद्रिय खत तयार करण्यासाठीही वापर करता येईल. पारंपरिक रांगोळी आणि फ्लॉवर डेकोरेशन यांच्या सुरेख मिलाफातून फुलांच्या रांगोळ्या साकारल्या जात आहेत. 

भारतीय सण, उत्सव, घरगुती समारंभांत पूर्वापार असलेले रांगोळीचे महत्त्व आजही कायम आहे. दिव्यांचा सण-दिवाळीमध्ये घरोघरी अंगणात रांगोळ्यांची रेलचेल असते. मंगल कार्यप्रसंगी शुभसंकेत मानल्या जाणाऱ्या रांगोळीसाठी पहाटेपासूनच लगबग सुरू होते. महिला, युवतींसोबतच हल्ली युवकांचाही रांगोळी हा आवडता कलाप्रकार आहे. सध्या वेगळेपणामुळे फुलांच्या रांगोळ्या साकारल्या जात आहेत.

खडूने बाह्यरेषा काढून त्यामध्ये रांगोळीसोबत काही प्रमाणात फुलांचा, पानांचा, पाकळ्यांचा वापर किंवा पूर्ण पाने-फुले-पाकळ्यांचा वापर करून ही रांगोळी काढली जाते. यातील निशिगंध, मोगरा, गुलाब, गुलाबाच्या पाकळ्या, तगर, कण्हेरी, पारिजात यांचे नैसर्गिक सुगंध वातावरण प्रसन्न करतात. यातील राधा-कृष्ण, गणपती, कैलास पर्वतावरील महादेव व जटांमधून वाहणारी गंगा, शिवाजी महाराज, निसर्गचित्र, नृत्यांगना, मोर, चिमणी, पोपट आदी विविधरंगी पक्षी, प्राणी अशा प्रकारच्या कलाकृती भुरळ पाडत आहेत.

या रांगोळ्या अनेक थरांच्या, बहुमजली ही काढल्या जातात. यात डेकोरेशनसाठी मातीच्या, तसेच कलात्मक पणत्या, समई, पाण्यावर तरंगणारे दिवे, सागरगोटे, कलात्मक दिसणारी मडकी, छोट्या कुंड्या आदी विविध वस्तूंचा वापरही होत आहे. जमिनीवरील रांगोळी, परातीतील रांगोळी, पाण्यावरील रांगोळ्या, मोठ्या तोंडाच्या उथळ भांड्यात पाणी घेऊन त्यावर फुलांची कलात्मक रचना केली जाते. असे प्रयोग करून अंगणाचे सौंदर्य खुलविले जात आहे. 

आकर्षक पुष्परचना असलेली ही कलाकृती कमी किंवा जास्त जागेत, पायऱ्यांवर, अगदी अडचणीच्या जागेतही लक्ष वेधून घेते. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कल्पनाशक्तीला अंत नाही. झेंडू, शेवंती, स्वस्तिक या फुलांसोबतच उपलब्ध असलेल्या कुठल्याही फुलांचा, झाडा-झुडपांच्या पानांचा, गवताचा यात वापर करता येतो. सुगंधी फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक सुवास दरवळतो. यामुळे वातावरण प्रसन्न राहते.
- कैवल्या घाटगे, अन्वी इव्हेंटस्‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com