भाई बागल पुरस्कार पुष्पा भावे यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

कोल्हापूर - भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. 30) बागल यांच्या 121 व्या जयंतीदिनी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. येथील शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाचला समारंभ होईल. प्राचार्य टी. एस. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. परिवर्तनवादी नेते संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, ऍड. गोविंद पानसरे, किशोर बेडकिहाळ यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यंदा भावे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शाल, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पाच हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्रीमती भावे लोकशाहीर अमर शेख यांच्यासोबत समाजकार्यात आल्या. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी सहभाग घेतला. स्वातंत्र्यसेनानी एस. एम. जोशी यांच्यासोबत काम केले. 1960 नंतर त्यांनी दलित समाजातील व्यक्ती तसेच महिलांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. शिवाय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ व डॉ. बाबा आढाव यांच्या "एक गाव एक पाणवठा', "हमाल पंचायत' अशा चळवळीत त्यांनी काम केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत यंदा त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.