बिद्री ची 3100 तर घोरपडे कारखान्याची पहिली उचल ३०००

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याने पहिली उचल 3100 रुपये तर काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याने पहिली उचल 3100 रुपये तर काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

दूधगंगा-वेदगंगा कारखान्याची पहिली उचल प्रतिटन ३१०० रुपये

बिद्री - येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक दराची परंपरा कायम राखत यंदा विनाकपात प्रतिटन ३१०० रुपये पहिली उचल जाहीर केली. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ‘‘प्रशासकीय कारकिर्दीत केवळ ४ लाख ५१ हजार टन उसाचे गाळप झाले. १२.५९ टक्के सरासरी उतारा मिळाला होता. चालू हंगामासाठी तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन २८६९ रुपये एफआरपी होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तोडग्यानुसार एफआरपी अधिक १०० रुपये असे २९६९ रुपये व दोन महिन्यांनंतर १०० रुपये असे ३०६९ रुपये द्यावे लागणार होते. यंदा उसाचा उतारा काही प्रमाणात वाढेल; मात्र साखरेचे दर २०० ते ३०० रुपयाने कमी होण्याची भीती  आहे. असे जरी असले तरी कारखाना कार्यक्षमपणे चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप व वीज उत्पादन करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.’’

ते म्हणाले, ‘‘ऊस उत्पादन वाढीसाठी बियाणे, औषधे, गांडुळ खत, तसेच ठिबक सिंचन अनुदान अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. कारखान्याची गाळप क्षमता ७५०० टनांपर्यंत वाढविणार आहोत. सर्व ऊस उत्पादक सभासदांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गळितास पाठवावा.’’
उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपतराव फराकटे, प्रवीणसिंह पाटील उपस्थित होते.

घोरपडे साखर कारखान्याची पहिली उचल तीन हजार रुपये

सेनापती कापशी - काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी कारखाना कार्यस्थळावर पत्रकार बैठकीत केली.

ते म्हणाले, ‘‘गेल्या हंगामात कमी पावसामुळे इतिहासातील सर्वांत कमी उत्पादन झाले. त्याचा थेट साखर उताऱ्यावर परिणाम झाला. अशा कठीण परिस्थितीतही कारखान्याने इतरांबरोबर दर दिला. यंदाचा हा चाचणी हंगामानंतरचा तिसरा हंगाम. आता कारखान्याचे स्वतःच्या हक्काचे ऊसक्षेत्र निर्मितीचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या लांबून ऊस आणावा लागतो, त्याचा वाहतूक खर्च वाढत आहे. यावर्षीची एफआरपी २६०१ रुपये असून, पालकमंत्र्यांच्या तोडग्यानुसार शंभर रुपये अधिक करून या कारखान्याची २७०१ रुपये उचल झाली असती. कारखाना नवीन आहे, कर्जाचे हप्ते जात आहेत. तरीही इतर कारखान्यांबरोबर दर देऊन केवळ ऊस उत्पादकांसाठी यंदाच्या हंगामात प्रतिटन तीन हजार रुपये देण्याचा धाडसी निर्णय घेतला.’’

ते म्हणाले, ‘‘सभासदांना महिना पाच किलोप्रमाणे साखर, गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन अर्धा किलो टनेज साखर दिली जाते. कंपोस्ट खत, मळी व राख, शेतकऱ्यांच्या बांधावर पोच केले जाते. ’’ या वेळी जनरल मॅनेजर महेश जोशी, प्रताप मोरबाळे, एम. एस. इनामदार, संतोष मस्ती, संतोष वाळके यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

‘हेमरस’ची पहिली उचल २८२०

कोवाड - कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून व चालू गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट लक्षात घेता सन २०१७-१८ च्या हंगामात ओलम - हेमरस ॲग्रो इंडिया प्रा. लि. राजगोळी खुर्द साखर कारखान्याकडे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन २८२० दिली जाणार आहे. त्यानंतरचा दुसरा हप्ता इतर कारखान्यांच्या बरोबरीने देणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रमुख भरत कुंडल यांनी दिली. 

श्री. कुंडल म्हणाले, ‘‘चालू हंगामात कारखान्यांनी पहिल्या टप्प्यात एफआरपी अधिक रुपये १०० व दुसऱ्या टप्यात रुपये १०० असे दोन टप्प्यांत देण्याचे ठरविले होते. पण हेमरसने एक पाऊल पुढे जाऊन एकूण २८२० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच कारखाना परिसरातील इतर कारखाने व लगतच्या तालुक्‍यातील साखर कारखान्यांपेक्षा उच्चांकी दर देणार आहे. गत हंगामातील अंतिम ऊस दराची कोंडी फोडून सर्वप्रथम कार्यक्षेत्रातील उसाला अंतिम उच्चांकी दर २९५० रुपये द्यावयाचे जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस हेमरस कारखान्याला पाठवून 
सहकार्य करावे.’’