‘बिद्री’च्या लुटारूंना घरचा रस्ता दाखवा - प्रा. संजय मंडलिक

‘बिद्री’च्या लुटारूंना घरचा रस्ता दाखवा - प्रा. संजय मंडलिक

सोळांकूर - दसऱ्याच्या मुहूर्तावर बिद्री कारखान्यातील के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट, लबाड टोळीला भुईसपाट करण्याचा निर्धार सभासदांनी केला आहे. विरोधी सत्तारूढ गट हा दहा तोंडी रावण आहे. आमदार मुश्रीफांना ‘संताजी’, तर समरजित घाटगेंना ‘शाहू’ चालवण्यासाठी ‘बिद्री’ची मदत गरजेची वाटते. यासाठी या मंडळींचे ‘बिद्री’त नेतृत्व आहे. कारखान्याची गळचेपी थांबवण्यासाठी या लुटारूंना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.

तुरंबे (ता. राधानगरी) येथील गणेश मंदिराच्या प्रांगणात राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आघाडीचे प्रमुख, माजी आमदार दिनकरराव जाधव होते.

प्रा. मंडलिक म्हणाले, ‘‘१२ वर्षांत त्यांनी कारखान्याचे क्रशिंग वाढवले नाही. माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांच्या काळातील कारखान्यात फक्त मॉडिफिकेशन केल्याशिवाय त्यांनी काही केले नाही. म्हणून ‘बिद्री’चे गाळप ११ लाख मे. टन प्रतिवर्षी करायचे हे आमच्या आघाडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी ‘बिद्री’ची प्रगती पहिल्यांदा, नंतर हमिदवाड्याची हे धोरण ठरवलेले आहे. रावणाच्या तावडीत सापडलेला हा जटायू सोडवण्यासाठी बिद्री बचाव, तर के. पी. हटाव याला पर्याय नाही.’’

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘आमच्या पॅनेलची रचना पाहून विरोधकांना धडकी भरली आहे. जीवन पाटील, अशोकराव फराकटे, नंदू पाटील, शामराव भोई ही दिग्गज मंडळी आघाडीत आल्याने के.पी., ए.वाय., मुश्रीफ यांना आता कळून चुकले आहे की आता खिंडाराचे भगदाडात रूपांतर झाले आहे. मतदारसंघातील सभासदांचा आमच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे.’’

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘‘कागल तालुका मंडलिक व घाटगे गटाच्या नेत्यांना मानणारा आहे. फक्त पै-पाहुण्यांचा विकास करण्यात राष्ट्रवादीचे नेते कार्यरत आहेत. त्यांना बिद्रीच्या चिमणीकडे बघण्याचे धाडस होऊ नये, असा धडा सभासदांनी शिकवावा.’’

आघाडीचे नेते माजी आमदार जाधव म्हणाले, ‘‘शेतकरी सभासदांच्या जिव्हाळ्याचा भाग असलेली ऊसतोडणी त्यांनी सुरळीत केली नाही. राष्ट्रवादीचे नेते भ्रष्ट आहेत. त्यांच्या बाजूने सभासद कधीच कौल देणार नाहीत.’’ ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव, विकास पाटील, जीवन पाटील, निवास पाटील, अशोक पाटील, अशोकराव फराकटे, धनाजी पाटील, धनाजी खोत यांचीही भाषणे झाली. माजी संचालक राजेखान जमादार यांनी स्वागत केले. माजी संचालक विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, बी. एस, देसाई, नंदकिशोर सूर्यवंशी, प्रा. अर्जुन आबिटकर, डी. एम. उगले, माजी उपसभापती अरुणराव जाधव, बाळासाहेब देवर्डेकर, विजय बलुगडे, बालाजी फराकटे, बाळासाहेब पाटील, विश्वनाथ तहसीलदार, नंदकुमार ढेंगे, अशोकराव वारके, मारुती फराकटे, डी. एस. पाटील उपस्थित होते.

मुश्रीफांवर आबिटकर, मंडलिकांची तोफ
आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंकेत ११७ कोटींचा दरोडा घातला तेव्हा चंद्रकांतदादा त्यांना जेलमध्ये पाठवणार होते. ते बाजूलाच राहिले. उलट तुम्ही त्यांच्याशी युती केली. मग ते खरे का तुम्ही खरे? अशी मिश्‍कील टिपणी आबिटकर यांनी केली. मंडलिक म्हणाले, ‘‘मुश्रीफ गटात आमचे फिक्‍स डिपॉझिट आहे; मात्र आता एक एक कार्यकर्ता आमच्याकडे परत येत आहे.’’

बजरंग देसाईंची दुटप्पी भूमिका
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत शौमिका महाडिक अध्यक्ष झाल्या, तेव्हा माजी आमदार बजरंग देसाई यांच्या सून जि. प. सदस्या रेश्‍मा देसाई गैरहजर का होत्या? म्हणजे तुम्हाला ‘गोकुळ’ही पाहिजे. इकडे तुमचे नेते सत्तेत यायला पाहिजेत. मग तुम्ही पैसे खाल्ल्याने गैरहजर ठेवले, हे जग ओळखत नाही का? यात देसाईंची दुटप्पी भूमिका समजते, अशा शब्दात तळाशीचे बॅरिस्टर अशी बोचरी टीका करणाऱ्या माजी आमदारांचा मारुतीराव जाधव यांनी समाचार घेतला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com