‘बिद्री’च्या कार्यक्षेत्रात गावोगावी ‘म्हाई’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कोल्‍हापूर - दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे मतदान अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपल्याने खोऱ्यात प्रचाराचा धुरळा उडत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जेवणावळींबरोबर दिवाळीसाठी पाकिटांचेही वाटप सुरू आहे.​

कोल्‍हापूर - दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे मतदान अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपल्याने खोऱ्यात प्रचाराचा धुरळा उडत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जेवणावळींबरोबर दिवाळीसाठी पाकिटांचेही वाटप सुरू आहे.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक दोन वर्षांपासून गाजत आहे. कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. त्यांच्याविरोधात आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी लढाई सुरू केली. नंतर या लढाईत के. जी. नांदेकर, विजयसिंह मोरे यांच्यासारखी मंडळी सहभागी झाली.

स्थानिक गटांना सोबत घेऊन ‘राष्ट्रवादी’ने सत्ता स्थापन केली. गेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली होती. त्यामुळे या वेळीही ‘राष्ट्रवादी’ आपल्या नेतृत्वाखाली पॅनल करेल, असे वाटत होते; पण आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी ‘सभासदांच्या हितासाठी’ हातमिळवणी केली. भाजपला सहा जागा देण्याचे ठरल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते नाराज झाले. पॅनल तयार करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेचे सदस्य व के. पी. पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते जीवन पाटील यांच्यासह काही मंडळी विरोधी गटात दाखल झाली. त्यामुळे या निवडणुकीतील प्रचारातील चुरस अधिकच वाढली.

प्रचारसभांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. याशिवाय, निवडणुकीत जे काही करावे लागते त्याची तयारी दोन्ही आघाड्यांकडून आपापल्या परीने करण्यात आली. प्रचारासाठी उद्याचा एकच दिवस असल्याने उमेदवारांसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महत्त्वाच्या गावांमध्ये जेवणावळी सुरू आहेत. शनिवारी बहुतांश लोक मांसाहार टाळतात, रविवारी संकष्टी आणि मतदान त्यामुळे आज जेवणावळींना ऊत आला होता. याशिवाय, ज्या गटात ‘काँटे की टक्‍कर’ आहे, अशा गटातील उमेदवारांनी आता आपले हात सैल सोडण्यास सुरवात केली आहे. 

धोरण नसणारी विरोधकांची आघाडी - मंत्री पाटील

मुरगूड - बिद्री साखर कारखान्याची नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली आहे. २१८ गावांतील जनतेच्या अर्थकारणाशी निगडित इथला कारभार आहे. त्यामुळे हा कारभार चांगल्या माणसांच्या हातात देणे गरजेचे होते म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. आमचे विरोधक आमदार आबिटकर बिद्रीत काय करणार यावर न बोलता विधानसभेची निवडणूक लागल्याप्रमाणे बोलत सुटले आहेत.

खरे तर विरोधकांकडे बिद्रीच्या विकासाचे कसलेही धोरण नाही. कुठलेही धोरण नसणारी आघाडी आहे, अशी खरमरीत टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मुरगूड (ता. कागल) येथे आयोजित महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. तानाजीराव मगदूम अध्यक्षस्थानी होते. ए. वाय. पाटील, भैया माने, अमरसिंह घोरपडे, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, प्रवीण भोसले उपस्थित होते.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘आमच्या विरोधकांनी ५ हजार बोनस देणार, असे जाहीर केले आहे. सभासदांना त्यातून ३५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. हे पैसे ते कोठून आणणार आहेत ? का कारखाना विकून देणार आहेत. या घोषणेबद्दल विरोधी आघाडीचे प्रमुख दिनकरराव जाधव मात्र काहीही बोलत नाहीत. सभासदांची फसवणूक करणाऱ्या विरोधकांचे या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होईल.’’

म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘‘विरोधकांनी काय अभ्यास केलाय ‘बिद्री’च्या कारभाराचा. ३५ कोटी रुपये आणणार कोठून, यावर दिनकरराव जाधव काहीही बोलत नाहीत. कारण यातील त्यांना चांगला अभ्यास आहे; पण त्यांना विचारात न घेताच ही मंडळी घोषणा करत सुटली आहे. ज्यांच्याकडे ज्येष्ठांना विचारात घेण्याची प्रवृत्ती नाही. ते सभासदांना काय न्याय देणार?’’

माजी आमदार के. पी. पाटील, प्रवीणसिंह पाटील, अशोक चौगले यांची भाषणे झाली. सभेस नीताराणी सूर्यवंशी, विकास पाटील, दत्तामामा खराडे, एम. डी. रावण, अविनाश पाटील, वसंतराव शिंदे, प्रा. चंद्रकांत जाधव, ॲड. सुधीर सावर्डेकर आदी उपस्थित होते. अनंत फर्नांडिस यांनी आभार मानले.

हिम्मत असेल तर मैदानात या - आमदार आबिटकर 

गारगोटी - मुख्यमंत्री राज्यातील कोट्यवधीचा निधी विदर्भात नेत आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तुम्ही तिकडे दुर्लक्ष करताय आणि आमच्या मतदारसंघावर कशाला बोलताय? तुम्ही येथे कोणाकोणाला आमदार करणार? हिम्मत असेल तर तुम्हीच विधानसभेच्या मैदानात या. मी कुस्‍तीला तयार आहे, असे जाहीर आव्हान आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. बिद्री निवडणुकीतील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी आमदार दिनकरराव जाधव अध्यक्षस्थानी होते.

आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘दादा, तुम्ही राज्याचे मंत्री असाल, मी या मतदारसंघातील जनतेचा मुख्यमंत्री आहे. शिवडाव-सोनवडे घाट, गारगोटी-कोल्हापूर रस्ता केल्याचे सांगतो; पण राज्याचे मोठे मंत्री असताना राज्याच्या बजेटमधील मोठा वाटा विदर्भात जातोय. तुम्ही बजेटमधून किती रक्कम मतदारसंघात आणली, हे जाहीर करा. जिल्हा बॅंकेतले कारभारी हसन-किसन त्यांच्या टोळीला तुरुंगात टाकणार होता. सर्वांवर तुम्ही पडदा टाकून सहकार बुडविणाऱ्यांच्या टोळीत सहभागी झालात, याबद्दल जनतेत संभ्रम आहे.’’

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘‘राज्यात साखर उताऱ्यात अग्रेसर असणारा बिद्री कारखाना दरात मागे का?’’ माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘‘के. पी. पाटील यांनी पै-पाहुण्यांचा गोतावळा मोठा केला. बिद्रीचा कारभार खरोखर चांगला केला असता तर आणखी दर देता आला असता.’’

विक्रम पाटील, राजेखान जामदार, के. जी. नांदेकर यांची भाषणे झाली. सभापती सरिता वरंडेकर, नंदकुमार ढेंगे उपस्थित होते. धनाजी खोत यांनी स्वागत केले. शामराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. राजू चिले यांनी आभार मानले.