‘बिद्री’त राष्ट्रवादी-भाजपच निर्विवाद

‘बिद्री’त राष्ट्रवादी-भाजपच निर्विवाद

कोल्हापूर -  केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर, पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर धडाकेबाज विजय मिळवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील व समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले. या निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा धुव्वा उडाला. या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.

निकालानंतर राष्ट्रवादी-भाजप आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. या निवडणुकीत २१ जागांसाठी दोन्ही पॅनेलचे मिळून ४२ व अपक्ष ५ असे ४७ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी रविवारी (ता. ८) चुरशीने ८०.३२ टक्के मतदान झाले होते. एकूण ५८ हजार ८५९ पैकी ४७ हजार २७७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतांची टक्‍केवारी वाढल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सुकता जिल्ह्यात लागली होती.

मंगळवारी सकाळी आठ वाजता मार्केट यार्डला लागून असलेल्या रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. संस्था गटातील जागा जिंकून राष्ट्रवादी-भाजप आघाडीने विजयाचे खाते उघडले. हा निकाल साधारण साडेअकराच्या सुमारास लागला. मतमोजणीसाठी जेवढी मतदान केंद्रे, तेवढीच १८७ टेबलची व्यवस्था केल्यामुळे इतर गटांचे निकालही पटापट लागत गेले. रात्री अकराच्या सुमारास सर्व निकाल हाती आले; पण दुपारी दोननंतरच निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर विरोधी आघाडीचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्र सोडणे पसंत केले. संस्था गटाचा निकाल सोशल मीडियावरून व्हायरल होताच कागल, राधानगरी, भुदरगड व करवीरमधून गावागावांतील कार्यकर्त्यांचे जथ्थे मतमोजणी परिसरात दाखल होऊ लागले. 

संस्था गटानंतर भटक्‍या विमुक्त, अनुसूचित जाती, महिला प्रतिनिधी व इतर मागासवर्गीय गटाची मोजणी हाती घेण्यात आली. साधारण चारच्या सुमारास उत्पादक सहा गटांची मोजणी सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी-भाजप आघाडीचे उमेदवार सरासरी दोन हजार ते साडेचार हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले. निकालावरून वाढीव सुमारे ४५०० सभासद हे सत्ताधाऱ्यांच्याच मागे राहिल्याचे स्पष्ट झाले. 

मतमोजणीवेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांना कागलचे तहसीलदार किशोर घाटगे, भुदरगडचे तहसीलदार अमर वाकडे, राधानगरीच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल, सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी सहकार्य केले. मतमोजणीसाठी ३७६ कर्मचारी व राखीव १०० असे ४७६ कर्मचारी सहभागी झाले.  

प्रमुख विजयी 
विद्यमान संचालक माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराक्‍टे, धनाजी देसाई, श्रीपती पाटील, माजी संचालक बाबासाहेब हिंदुराव पाटील.

प्रमुख पराभूत
माजी आमदार दिनकरराव जाधव, विद्यमान संचालक व जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, माजी संचालक के. जी. नांदेकर, विजयसिंह मोरे, नंदकिशोर सूर्यवंशी, अशोक फराक्‍टे, विजय बलुगडे, नंदुभाऊ पाटील-बिद्री, बालाजी फराक्‍टे, दत्तात्रय उगले, बाबूराव देसाई, माजी शिक्षणाधिकारी शामराव भोई यांचा प्रमुख पराभूत उमेदवारांत समावेश आहे. 

१४ नव्या चेहऱ्यांना संधी 
विठ्ठलराव खोराटे, राजेंद्र पांडूरंग पाटील, एकनाथ पाटील, उमेश भोईटे, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, धोंडीराम मगदूम, केरबा पाटील, जगदीश पाटील, अशोक धुळाप्पा कांबळे, अर्चना विकास पाटील, नीताराणी सुनीलराज सूर्यवंशी, युवराज आनंदा वारके, प्रदीप शिवाजी पाटील या १४ चेहऱ्यांना कारखान्यांत संचालक म्हणून संधी मिळाली. 

खुलेआम संपर्क  
मतमोजणीच्या ठिकाणी एरव्ही मोबाईल आणि संपर्काच्या साधनांना पूर्णपणे बंदी असते; परंतु या मतमोजणीच्या ठिकाणी असे कोणत्याही प्रकारचे बंधन ठेवले नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण जागेवरून निकालाच्या अपडेट गावोगावी पोचवताना दिसत होता. या खुलेआम संपर्कामुळे गावागावातून उत्साही कार्यकर्त्यांच्या मतमोजणीच्या ठिकाणी येण्याचा ओघ कमी झाला. 

मोठ्या प्रमाणात अवैध मते -
या निवडणुकीत २१ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. ११ प्रकारच्या मतपत्रिका दिल्या होत्या. प्रत्येक गटाचे मतदान मोजताना मोठ्या प्रमाणात ६०० ते १००० इतकी अवैध मते झाल्याचे दिसून आले. शिक्के असल्याने आणि बऱ्याच मतपत्रिकांना शाई लागल्याने मते बाद झाली. 

मतमोजणीचे नेटके नियोजन
निवडणूक म्हटलं की, तक्रारी, वाद-विवाद आणि प्रशासनावर आक्षेप या बाबी ठरलेल्याच आहेत. परंतु, चार तालुक्‍यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी सुयोग्य नियोजन केले होते. माध्यमे, कार्यकर्ते, उमेदवार आणि सभासद मतदार यांना एकाही तक्रारीची संधी दिली नाही. मतमोजणीच्या वेळी देखील तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत खुल्या व पारदर्शी पद्धतीने नियोजन केल्यामुळे सर्वांकडून समाधान व्यक्त होत होते. 

नाराजांची निराशाच 
ऐन माघारीच्या आधी अर्धा तास बिद्री कारखाना निवडणुकीत नेहमीप्रमाणे नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. सत्तारूढ के. पी. पाटील यांच्या गटातून जि. प. सदस्य जीवन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, बाजार समितीचे माजी सदस्य शामराव भोई आणि अशोक फराकटे हे विरोधी गटात सामिल झाले. त्यांना उमेदवारीही देण्यात आली. परंतु, त्यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली. 

भक्कम आघाडीला यश 
के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी-भाजप, जनता दल आघाडीबाबत साशंकता होती. प्रचारात देखील विरोधकांनी या आघाडीतील बिघाडीचा मोठा प्रचार केला होता. याचा फायदा आपल्याला होणार असा संदेश सोशल मीडियावरून पसरवला जात होता. याचा फायदा आपल्यालाच होणार असे विरोधी नेते खासगीतही सांगताना दिसत होते; परंतु ही आघाडी भक्कमच असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. 

भाजपचा यशस्वी शिरकाव
या निवडणुकीच्या आधी भाजप काय निर्णय घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही आघाड्यांशी चर्चा करीतच ऐनवेळी राष्ट्रवादी - भाजप आघाडी घडवून आणली. जिंकणाऱ्या बाजूला राहून आपला शिरकाव करण्याचे त्यांचे मनसुबे या विजयाने यशस्वी झाले. यामध्ये भाजपला सहा जागा मिळाल्या.

वाढीव सभासदांचा दणका विरोधकांना
निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून सत्ताधाऱ्यांनी सुमारे १३ हजार ५०० नवे सभासद केले होते. यावर आक्षेप घेऊन यातील सुमारे ९८०० सभासद विरोधकांनी रद्द ठरवले; पण उर्वरित साडेचार हजार सभासद हे सत्ताधाऱ्यांबरोबरच राहिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे सभासद रद्दचा फटका विरोधकांना बसल्याचे दिसून आले. 

संस्था गटाची मते फुटली
संस्था गटातील ठराव एकत्र करून प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे देताना सत्ताधाऱ्यांकडे विरोधकांपेक्षा सुमारे २१५ ठराव जादा होते. प्रत्यक्ष निकालात मात्र यातील बहुतांशी मते फुटल्याचे स्पष्ट झाले. या गटातील १०५० पैकी १०३७ संस्था प्रतिनिधींनी मतदान केले. त्यात सत्तारूढ गटाचे जगदीश पाटील हे केवळ ५२ मतांनी विजयी झाले. जगदीश पाटील यांना ५४१, तर जीवन पाटील यांना ४९० मते मिळाली. चार मते या गटात अवैध ठरली.

दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यात सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराच्या जोरावर भाजपने पुढाकार घेऊन महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी स्थापन केली. सभासदांच्या उसाला उच्चांकी दर मिळण्याबरोबरच कारखाना सक्षम बनवून सभासदांना जास्तीत जास्त नफा कसा देता येईल व कारखाना राज्यात क्रमांक एकचा बनवू.                          

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

सभासदांच्या हितासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात लढलो. एकीकडे धनाढ्य सत्ताधाऱ्यांची शक्ती तर दुसरीकडे आमचे सामान्य कार्यकर्ते असा आमचा संघर्ष राहिला. तरीही सभासदांनी जो निकाल दिला तो आम्ही मान्य करतो. काही चुका झाल्या असतील तर त्या यापुढे सुधारून आम्ही जनतेच्या हितासाठी ताकदीने कार्यरत राहू.
 - प्रकाश आबिटकर, आमदार

या निवडणुकीत सभासदांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मताधिक्‍य थोडे कमीच झाले, याचेही दुःख आहे. परंतु, या निवडणुकीत कागल तालुक्‍यातून सर्वच उमेदवारांना विक्रमी मताधिक्‍य दिल्याने कागलच या निवडणुकीत किंगमेकर ठरले. या निवडणुकीत के. पी. पाटील यांनी जी आश्‍वासने दिली, ती ते नक्की पाळतील.              

- हसन मुश्रीफ, आमदार

कारखाना आपल्या ताब्यात असताना अतिशय चांगला कारभार केला. राज्यात ‘लई भारी’ दर देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी खोटे-नाटे आरोप केले; पण चार तालुक्‍यांतील सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही चांगली साथ दिली. या निवडणुकीच्या तोंडावर सभासद रद्द करणाऱ्यांना धडा शिकवला. - के. पी. पाटील, माजी आमदार व पॅनेलप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com