भारद्वाज, कोकिळा अन्‌ व्हॅगटेलही...!

भारद्वाज, कोकिळा अन्‌ व्हॅगटेलही...!

कोल्हापूर - भारद्वाज, कोकिळा, डोमकावळा, कोतवाल, गप्पीदास, तारवाली, व्हॅगटेल, स्वालो, मैना, स्पूनबील, शेकाट्या, वेडा राघू, राखी धनेश, पान कावळा, स्पॉटबील डक, पर्पल हेरॉन...अशा देशी आणि परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट आज विद्यार्थी व पालकांनी अनुभवला.

‘सकाळ’च्या ‘एनआयई’ परिवारातर्फे कळंबा परिसरात झालेल्या या पक्षी निरीक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षीमित्र सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. 

हिवाळ्यात पक्षी विविध ठिकाणी स्थलांतर करत असतात. अगदी परदेशी पाहुणेही कळंबा परिसरात येतात. त्यांना पाहण्याची हीच पर्वणी आज अडीचशेहून अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी साधली. हे पक्षी कोठून आले, कसे आले, त्यांचे नाव काय, ते कसे स्थलांतर करतात, त्यांची वर्तणूक, पक्ष्यांच्या पारिवारिक जीवनासह इतर इत्थंभूत माहिती या वेळी श्री. वायंगणकर यांनी दिली. टेलिस्कोपच्या साहाय्याने पक्षी निरीक्षण झाले. पक्ष्यांचे आवाज आणि छायाचित्रेही अनेकांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केली. मुलांना पक्ष्यांबद्दल आणि एकूणच पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम झाला. 

एनआयई समन्वयक सुशांत पाटोळे यांनी संयोजन केले. संकल्प माध्यमिक विद्यालय, कळंबा गर्ल्स हायस्कूल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल, नूतन मराठी विद्यालय, इंदूमतीदेवी गर्ल्स हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, आदर्श प्रशाला, चाटे स्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, वालावलकर हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, रा. ना. सामाणी विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.  

‘संकल्प’चे मुख्याध्यापक प्रकाश सुतार, आदर्शचे आर. बी. माने.डी. पी. सुतार, वालावलकरचे प्रमोद कुलकर्णी, संजय सौंदलगे, पद्माराजेचे महेश सूर्यवंशी, इंदूमतीच्या सीमा सूर्यवंशी, कळंबा हायस्कूलचे नितीन देवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com