बिद्री कारखाना निवडणूकीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीची घौडदौड सुरुच 

बिद्री कारखाना निवडणूकीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीची घौडदौड सुरुच 

कोल्हापूर - आजी -माजी मंत्री व आमदारांच्या सहभागाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीच्या श्री महालक्ष्मी आघाडीची घोडदौड सुरूच आहे. आत्तापर्यंत सातजागांवर आघाडीने विजय मिळविला आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू आघाडीस अद्याप एकही जागा मिळालेली नाही. सरासरी 3770 मताच्या मताधिक्‍याने सत्ताधारी गट आघाडीवर आहे.

कोल्हापूरच्या रामकृष्ण हॉल येथे मतमोजणी पार पडली. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. प्रथम सर्व मते गटनिहाय विभागणी करण्यात आली. त्यानंतर 187 टेबल वर 25 मताचा एक गठ्ठा असे केंद्रनिहाय गठ्ठे देण्यात आले. तर दुसरीकडे संस्था गटातील तीन केंद्रावरील मतमोजणी सुरु झाली. संस्था गटातून सत्तारुढ महालक्ष्मी आघाडीच्या जगदीश मारुती पाटील यांना 542 मते पडली, तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीच्या जीवन पाटील यांना 490 मते पडली. जगदीश पाटील हे 52 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. हा निकाल सोशल मिडीयावरून व्हायरल होताच कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर मधून गावागावातील कार्यकत्यांचे जथ्थेच्या जथ्थे मतमोजणी परिसरात दाखल होवू लागले. 

प्रदीप पाटील, युवराज वारके विजयी 
त्यानंतर भटक्‍या विमुक्त आघाडीच्या गटाची मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये प्रदीप शिवाजी पाटील यांना 25,334 मते मिळाली तर विरोधी शामराव दत्तात्रय भोई यांना 21,326 मते पडली. यामध्ये महालक्ष्मी आघाडीचे प्रदिप पाटील हे 4008 मताने विजयी घोषित करण्यात आले. 
इतर मागासवर्गीय गटात युवराज आनंदराव वारके यांना 25801 तर विरोधी बाजीराव ईश्वरा गोधडे यांना 20918 मते पडली. यामध्ये महालक्ष्मी आघाडीचे युवराज वारके हे निकालातील हॅट्रीक साधत 4883 मतांनी विजयी झाले. 

खुलेआम संपर्क.. 
मतमोजणीच्या ठिकाणी एरव्ही मोबाइल आणि संपर्काच्या साधनांना पूर्णपणे बंदी असते, परंतु या मतमोजणीच्या ठिकाणी असे कोणत्याही प्रकारचे बंधन ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण जाग्यावरुन निकालाच्या अपडेट गावोगावी पोहचवताना दिसत होता. या खुलेआम संपर्कामुळे गावागावातून येणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांच्या मतमोजणीच्या ठिकाणी येण्याचा ओघ कमी झाला. 

मोठ्या प्रमाणात अवैध मते... 
या निवडणुकीत 21 जागासाठी 47 उमेदवार रिंगणात होते. 11 प्रकारच्या मतपत्रिका दिल्या होत्या. प्रत्येक गटाचे मतदान मोजताना मोठ्या प्रमाणात 600 ते 1000 इतकी अवैध मते झाल्याचे दिसून आले. शिक्के असल्याने आणि बऱ्याच मतपत्रिकांना शाई लागल्याने मते बाद झाली. - 

योग्य नियोजन.. 
निवडणुका म्हटलं कि, तक्रारी, वाद-विवाद आणि प्रशासनावर आक्षेप याबाबी ठरलेल्याच आहेत. परंतु चार तालुक्‍यातील 218 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकरी सचिन इथापे यांनी सुयोग्य नियोजन केले होते. माध्यमे, कार्यकर्ते, उमेदवार आणि सभासद मतदार यांना एकही तक्रारीची संधी दिली नाही. मतमोजणीच्या वेळी देखील तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करत खुल्या व पारदर्शी पध्दतीने नियोजन केल्यामुळे सर्वाकडून समाधान व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com