‘बिद्री’त भाजप-सेना आघाडी?

‘बिद्री’त भाजप-सेना आघाडी?

भाजपला हव्यात सात जागा, दादांच्या उपस्थितीत हाळवणकर-आबिटकर-मंडलिक चर्चा

कोल्हापूर ः बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित होऊन, या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असतानाच  शिवसेना नेत्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरही आघाडीचा प्रस्ताव ठेवला. 

दरम्यान, भाजपने शिवसेनेकडे सात जागांची मागणी केली असून, त्यावर इतरांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन या बैठकीला उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर व प्रा. संजय मंडलिक यांनी दिले. या वेळी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकरही उपस्थित होते. हॉटेल अयोध्या येथे ही बैठक झाली. या निवडणुकीत भाजप-शिवसेना अशीच आघाडी होईल, असा दावा या बैठकीला उपस्थित शिवसेना नेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. 

‘बिद्री’च्या निवडणुकीत भाजपला महत्त्व आले आहे. चार तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कागल तालुक्‍यात ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व मुरगुडचे प्रवीणसिंह पाटील यांची, भुदरगड तालुक्‍यात माजी आमदार बजरंग देसाई यांची मदत हवी आहे. ही मदत मिळायची असेल, तर भाजपसोबत आघाडी करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची पालकमंत्री पाटील, आमदार हाळवणकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत भाजपला पाच जागा देण्याचा निर्णय सर्वानुमते मान्य करून ही आघाडी निश्‍चित झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये उत्पादक गटातील तीन, भटक्‍या विमुक्त व महिला प्रनिनिधी गटातील प्रत्येकी एक जागा भाजपला देण्याचे ठरले. राष्ट्रवादीने ही तडजोड मान्य केली होती. 

एकीकडे राष्ट्रवादीशी आघाडी निश्‍चित झाली असतानाच आज पालकमंत्री पाटील यांच्यासह हाळवणकर यांच्याशी शिवसेनेचे आमदार आबिटकर, प्रा. संजय मंडलिक यांनी हॉटेल अयोध्या येथे चर्चा केली. या चर्चेत पालकमंत्री पाटील यांनी शिवसेनेकडे सात जागांची मागणी केली. राज्यात व देशातही भाजपसोबत शिवसेनेची आघाडी असल्याने हीच आघाडी या कारखान्याच्या निवडणुकीत कायम राहावी, असे श्री. आबिटकर यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. त्यावर भाजपकडून जागांचा प्रस्ताव देण्यात आला. आघाडीतील इतरांशी चर्चा करून दोन दिवसांत त्यावर निर्णय देण्याचे आश्‍वासन श्री. आबिटकर, प्रा. मंडलिक यांनी दादांना दिले. 

दोन्ही गटांशी चर्चा सुरू - हाळवणकर
याबाबत आमदार हाळवणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘दोन्ही गटांशी आमची चर्चा सुरू आहे. एक -दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. आज शिवसेना नेत्यांसोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली. अंतिम निर्णय सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल.’’

मी अवाक्‌ झालो - मुश्रीफ
आज शिवसेना-भाजप नेत्यांत झालेल्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला. पुतण्याच्या मुलाच्या लग्नासाठी ते हुबळीत होते. ते म्हणाले, ‘‘यापूर्वीच आमची व भाजपची आघाडी झाली आहे. पालकमंत्री पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांना पाच जागा देण्यावर एकमत झाले. त्यांनीही याला मान्यता दिली आहे. त्या वेळी माझ्यासह के. पी., ए. वाय. व हाळवणवकर उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा शिवसेना नेत्यांशी बैठक झाल्याचे ऐकल्यानंतर मी अवाक्‌च झालो; पण शिवसेनेचे लोक आले म्हणून त्यांनी चर्चा केली असेल. डॉल्बीमुक्त मिरवणूक झाली म्हणून अंबाबाईला दंडवत घालणाऱ्या पालकमंत्री पाटील यांच्यासारखा माणूस बदलणार नाही, असे मला वाटते.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com