धनगरवाड्याच्या रुग्णांना छकड्याचा आधार...

रणजित कालेकर
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

आजरा -  देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे लोटली; पण दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांचे हाल व समस्या संपलेल्या नाहीत. या लोकांना आजही पायाभूत सुविधांसाठी धडपडावे लागत आहे. आजरा तालुक्‍यातील आवंडी धनगरवाड्यावरील हे बोलके चित्र बरेच काही सांगून जाते.

आजरा -  देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे लोटली; पण दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांचे हाल व समस्या संपलेल्या नाहीत. या लोकांना आजही पायाभूत सुविधांसाठी धडपडावे लागत आहे. आजरा तालुक्‍यातील आवंडी धनगरवाड्यावरील हे बोलके चित्र बरेच काही सांगून जाते.

येथील नागरिकांना आजऱ्याला जाण्यासाठी जंगलातून प्रवास करावा लागतो. हिंस्त्र श्‍वापदे यांच्याशी सामना करत त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. रुग्णांचे हाल तर वेगळेच असतात. कधी पाठीवरून, कधी पाळणा करून, तर कधी छकडा गाडी ओढत रुग्णांना न्यावे लागते. आजऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आवंडी धनगरवाडा आहे. हा धनगरवाडा तीन वसाहतींमध्ये विखुरलेला आहे. सत्तर घरांच्या या वसाहती आहेत. धनगरवाडा क्रमांक एकपर्यंत पक्का रस्ता आहे; पण हा रस्तादेखील उखडलेला आहे. 

धनगरवाडा क्रमांक एकपासून दोन व तीनपर्यंत कच्चा रस्ता आहे; पण पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतः खराब झालेला असतो. येथून ये-जा करणे धोकादायक आहे. या वसाहतीवरील नागरिकांना जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागतो. हिंस्त्र श्‍वापदांचा सामना करीत त्यांना जावे लागते. यात रुग्णांचे मोठे हाल होतात.

पावसाळ्यात तर रुग्णांची हलाखीची परिस्थिती असते. मोठा त्रास सोसत त्यांना मार्ग काढावा लागतो. रुग्णांना पाठीवर, पाळणा करून आजऱ्याला दवाखान्यात न्यावे लागते. आजरा येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या आवंडी धनगरवाडा क्रमांक तीनवरील रहिवासी बाळू जगन्नाथ कोकरे याचे कबड्डी खेळताना पायाचे हाड मोडले होते. त्याला दवाखान्यातून गावी नेताना छकड्यातून न्यावे लागले. ग्रामस्थांनी छकडा स्वतः ओढून चार किलोमीटर त्याला गावी नेले. या निमित्ताने येथील पायाभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने पुढे आला आहे.

त्या ‘थरारक’ प्रवासाची आजही आठवण
सात वर्षांपूर्वी धनगरवाडा क्रमांक तीनवरील एका मुलीवर अस्वलाने हल्ला केला होता. रात्रीच्या वेळी जखमी मुलीला पाठीवर घेऊन ग्रामस्थांना उपचारासाठी आजऱ्यातील दवाखान्यात दाखल करावे लागले. जलद हालचाली केल्याने मुलीचे प्राण वाचले. साहजिकच त्या थरारक प्रवासाची आठवण आजही ग्रामस्थ सांगतात.