वन गुन्ह्यांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस

वन गुन्ह्यांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस

कोल्हापूर -  जंगलाच्या वाटेवर जाता जाता रस्त्यात कुठे तरी बेकायदा झाडे तोडणारे दिसले, जंगली लाकडे बेकायदा गाडीत भरताना दिसले, जंगलात कोणी चोरट्या शिकारीच्या उद्देशाने जाणारे दिसले, वन्यजीवांना दुखापतीची शक्‍यता आढळली तर तशी खात्रीशीर माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देऊ शकता.अशा माहितीची खात्री करून वन अधिकारी गुन्हा रोखण्यास पुढाकार घेतील. यात खरी माहिती देणाऱ्या संबधीत व्यक्तीला वाढीव रक्कमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. या नव्या पर्यायामुळे वन गुन्ह्यांची खबर देणाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबर वनसंरक्षण कार्याला बळकटी येणार आहे.      

वनविभागाच्या अखत्यारीतील गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना बक्षीस देण्याची प्रथा वनविभागात आहे. मात्र त्यात अनेकदा शासकीय बक्षीस रक्कमेपेक्षा वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, वनपाल स्वतः पदरमोड करून बक्षीस देतात. तर कांही मोजक्‍या प्रकरणात कागदोपत्री पुरावे, प्रशासकीय पाठपुराव्यानंतर खबऱ्यांना अशी मदत मिळते. तिही तुटपुंजी असते. नव्या निणर्यानुसार मदतीच्या रक्कमेची वाढ केली आहे. संबंधित व्यक्तीने दिलेली खबर किती महत्वाची, किती वनसंपदा व वन्यजीवाचे रक्षण करण्यास मदत करणारी ठरली यावर बक्षीसाची रक्कम ठरणार आहे. ही रक्कम एक हजारापासून तीन हजार रूपयांपर्यंत असणार आहे.  

राज्यात सध्या वनविभागाच्या विविध पथकाकडून वन्यजीव व वनसंपत्तीच्या संरक्षणाचे काम होत आहे. मात्र एका वनरक्षक,वनपालाच्या हद्दीत जवळपास २० ते ५० गावे येतात. प्रत्येक ठिकाणी जंगली भाग विखुरलेला असतो. सर्वच भागावर नियंत्रण ठेवणे वनरक्षकाला शक्‍यही नसते त्यामुळे वनसंरक्षणांच्या कामात खबऱ्यांचे जाळे महत्वपूर्ण ठरते.  

पश्‍चिम घाटात जवळपास साडेतिनशे किलोमीटर रांगेत जंगलीभाग विखरूला आहे. पश्‍चिम घाटाबरोबर राज्यातील अन्य विभागातही घनदाट जंगल आहे. पश्‍चिम घाटात जवळपास दिडेशहून अधिक गावे वाड्यावस्त्या आहेत.या शिवाय १२ राज्य मार्ग तर दोन महामार्ग घाटातून जातात. याशिवाय गाव, वाडी वस्तीकडेही जाणारे शेकडो रस्ते आहेत. तर दोन अभयारण्य व एक व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांपासून ते ग्रामस्त पर्यंतची अनेकांचे जंगलाशी नाते जोडले आहे.

चोरट्या शिकारी, वनविभागाच्या हद्दीत जंगल तोड किंवा दुर्मिळ झाडांची,लाकडांची तस्करी करणे किंवा वन्यजीवांची शिकार करणे त्यांना दुखापत करणे, वणवे लावणे या उद्देशाने किंवा तशा प्रकारच्या कांही घटना घडत असतात. त्याची माहिती वनविभागाला कळविणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस मिळणार आहे. 

वर्षभरात ११० वनगुन्हे दाखल
गेल्या वर्षभरात जवळपास ११० वनगुन्हे दाखल झाले आहेत. यातील ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुन्ह्यांत खबऱ्यांनी दिलेल्याचा माहितीचा उपयोग झाल्याने जवळपास १५०  हून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातून गुन्हा शोधणे, गुन्हा वेळीच रोखणे किंवा गुन्ह्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी खबऱ्यांच्या माहितीचा उपयोग होणार आहे. 

नाव गोपनीय 
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून वनअधिकारी संशयित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करतील. पण यात माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यासाठी वनविभागाचे तालुकास्तरीय कार्यालय, गावातील वनरक्षक, वनपालापासून वनाधिकारी भरारीपथकापर्यंतच्या कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यासही माहिती मिळणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com