'चेतना संस्थेच्या वसतिगृहासाठी आराखडा करा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कोल्हापूर  - चेतना विकास संस्था गतीमंद मुलांना पाठबळ आणि शिक्षण देत आहे. त्यामुळे या संस्थेच्या जागेबाबतचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवून या संस्थेच्या मुलांना लिफ्टसह वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठीचा आराखडा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. शेंडापार्क येथील चंतना संस्थेस भेट दिल्यानंतर ते बोलत होते. 

कोल्हापूर  - चेतना विकास संस्था गतीमंद मुलांना पाठबळ आणि शिक्षण देत आहे. त्यामुळे या संस्थेच्या जागेबाबतचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवून या संस्थेच्या मुलांना लिफ्टसह वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठीचा आराखडा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. शेंडापार्क येथील चंतना संस्थेस भेट दिल्यानंतर ते बोलत होते. 

चेतना संस्था ही गेली 27 वर्षे शेंडापार्क येथील पाऊण एकर जागेत कार्यरत असून, या संस्थेने शासनाकडे जागेची मागणी केली आहे. या मागणीनुसार पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत आढावा घेतला. शेंडापार्क येथील जागेची मोजणी 60 टक्के पूर्ण झाली आहे. ती 15 दिवसांत पूर्ण करून त्याबाबतचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तत्काळ सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

पालकमंत्री म्हणाले, की चेतना संस्था सध्या जी जागा वापरत आहे, ती त्यांना शासनस्तरावर कायमस्वरूपी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. भविष्यात निवासी वसतिगृह, मैदान, प्रशासकीय इमारत, वैद्यकीय थेरपी सेंटर आदींसाठी आवश्‍यक जागेचा प्रस्ताव महिनाभरात सादर करा. नवीन जागा उपलब्ध होईपर्यंत सध्या आहे त्या जागेत लिफ्टसह या मुलांसाठी सुविधांनीयुक्त निवासी वसतिगृह उभारण्यासाठी आराखडा तत्काळ तयार करावा. सध्या या संस्थेत 200 मुले असून, अनुदान नसल्याने विद्यार्थी संख्या वाढविता येत नाही. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या अन्य काही मुलांना संस्था सामावून घेऊ शकत नाही, असे संस्थेने सांगताच जेवढे विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता असेल तेवढ्यांना प्रवेश द्या. अनुदानाव्यतिरिक्त लागणारा निधी "सीएसआर'मधून उपलब्ध करून दिला जाईल. संस्थेच्या वर्कशॉपमध्ये प्राथमिक शाळेतील मुलांचे सामान्यज्ञान वाढविणारे तयार केलेले कीट जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्यासाठी या संस्थेला पाच लाख रुपयांची ऑर्डर देण्यात येईल. संस्थेत कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींची ऑर्डर इच्छुकांनी दिल्यास त्यांचे पैसे आपण स्वत देऊ. या वेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, संस्थेचे संस्थापक पवन खेबुडकर, अध्यक्ष नरेश बगरे, दिलीप बापट उपस्थित होते. 

वर्कशॉपला दिली भेट 
पालकमंत्री पाटील यांनी संस्थेच्या इमारतीसह वर्कशॉपला भेट देऊन कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येत असलेल्या गणेशमूर्ती, संस्थेतील विद्यार्थ्यांकडून बनविण्यात येत असलेले शालोपयोगी साहित्य, फाईल्स, दीपावलीसाठी तयार करण्यात  आलेले गिफ्ट बॉक्‍स, चिमण्यांची घरटी यांची पाहणी केली.