त्रुटींची पुर्तता करून विमानसेवा त्वरीत सुरू करा - चंद्रकांत पाटील

त्रुटींची पुर्तता करून विमानसेवा त्वरीत सुरू करा - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक-एक दिवसाचा जो विलंब होत आहे त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तात्काळ पूर्ण कराव्यात व टेकऑफचा मार्ग लवकरात लवकर मोकळा करावा, अशा सूचना महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या उपसंचालिका सुब्रता सक्सेना, सहाय्यक संचालक मुकेश वर्मा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे जी. एम. एस. एस. बालन, डीजीएम  कृष्णकुमार, दिपक खोब्रागडे, मानसिंग माने, कोल्हापूर विमानतळाच्या पूजा मालू यांच्या पथकाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यामध्ये विमानसेवा नियमित सुरू होण्यामध्ये येत असलेल्या अडचणींचा व त्यावरील करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.

कोल्हापुरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, या दृष्टीने कंडिशनल लायसन्स द्या त्यामुळे त्रुटी दिलेल्या मुदतीत पुर्ण होतील, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विमानसेवा सुरू करण्यामध्ये कोणत्याही मोठ्या अडचणी नाहीत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या बाबी असतील त्या कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने लवकरात-लवकर पुर्ण कराव्यात.

यामध्ये विमानतळाची इमारत, एक किलो मीटरची वाढीव धावपट्टी, टॉवर आदी सर्व अनुषांगिक बाबींवर चर्चा झाली. कोल्हापुरमध्ये नियमित विमानसेवा सुरू होणे ही कोल्हापूर मधील औद्योगिक व अन्य घटकांसाठी अत्यावश्यक बाब असून जवळपास सहा-सात वर्षापासून बंद असलेल्या विमानसेवेमुळे कोल्हापुरच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. अनेक नवीन उद्योग, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये विमानसेवा नसल्याने येवू शकले नाहीत याचा जिल्ह्याच्या विकासावरही परिणाम झाला आहे. विमानसेवा लवकरात लवकर सुरू झाल्यावर त्याचा परिणाम सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये लवकरात-लवकर दिसून येतील त्यामुळे ही विमानसेवा लवकरात-लवकर सुरू व्हावी. त्यासाठी असणाऱ्या त्रुटी प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com