‘फिशिंग’द्वारेही फसवणूक

‘फिशिंग’द्वारेही फसवणूक

कोल्हापूर - इंटरनेट, ईमेलद्वारे तुमची गोपनीय माहिती मिळवून त्याचा फायदा बदनामी किंवा आर्थिक फसवणुकीसाठी होतो. आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक केली जाते. याला ‘फिशिंग’ असे म्हटले जाते. अशी फसवणूक शक्‍यतो इंटरनेटद्वारे केली जाते. साधारण २०११-१२ या दरम्यान रत्नागिरीमध्ये अशा पद्धतीच्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. तेव्हा येणारे ई-मेल इंग्लंडहून नव्हे, तर मुंबईतूनच नायजेरियन तरुणांकडून येत असल्याचे स्पष्ट झाले.

तुम्हाला एखादा मॅसेज येतो, ई-मेल येतो, तुम्हाला लॉटरी लागली आहे. आम्ही डॉलरमध्ये तुम्हाला पैसे देणार आहोत. इंटरनॅशनल ट्रान्स्फरसाठी तुम्ही अमूक रक्कम अशा, अशा अकाऊंटवर भरा. किंबहुना मी...देशात राहते-तो. माझे कुटुंबीय अपघातात मृत झाले. आमची प्रॉपर्टी पुष्कळ आहे.

मी मूळचा भारतातील आहे. भारतातच मला माझी प्रॉपर्टी डोनेट (दान) करायची आहे. असे ई-मेल पाठविले जातात. या ईमेलला उत्तर दिल्यानंतर संबंधित प्रॉपर्टीची रक्कम ट्रान्स्फर (पाठविणे) करण्यासाठी तुम्हाला अमुक या अकाऊंट क्रमांकावर अमुक इतकी रक्कम भरावी लागेल. प्रत्यक्षात ही रक्कम भरल्यानंतर काही वेळातच अकाऊंट कायमचे बंद होते. ते अकाऊंट कोणते होते, हेसुद्धा सहजासहजी समजणे अशक्‍य होते.

रत्नागिरीतील एका ग्राहकाला ई-मेल आला. त्याला इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणात मदत मिळाणार होती. त्यामुळे तो इंटरनॅशनल ट्रान्स्फरसाठी किती पैसे भरावे लागतील, याची माहिती विचारण्यासाठी बॅंकेत गेला. तेथील व्यक्तीने खात्री करून पैसे पाठवा, असेही त्यांना सांगितले. यानंतर तो पोलिसांकडे गेला. त्यांच्या सांगण्यावरून तो ई-मेलद्वारे संबंधितांच्या संपर्कात राहिला. ट्रान्स्फरचे पैसे देण्यासाठी संबंधितांनी त्याला बॅंकेत न जाता मुंबईत बोलवले. पोलिसांनी त्याच्यासोबत जाऊन तेथे दोघांना अटक केली. अधिक माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मुंबईत छापा टाकला. तेव्हा दोन फ्लॅटमध्ये सुमारे तीस-चाळीस नायजेरीयन तरुण सुमारे शंभर लॅपटॉपद्वारे हे मेल पाठवित होते. रोज किमान दहा-पंधरा हजारजणांना ई-मेल करत होते. यातील दोन-चार त्यांच्या गळ्याला लागत होते.

त्यांच्याकडील ई-मेलचा सर्व्हर पाहिला, तर तो इंग्लडमधील दाखवत होता. ग्राहकांना इंग्लंडहून ई-मेल आला आहे, असे वाटत होते. प्रत्यक्षात ते मुंबईतूनच सर्व्हर बदलून ई-मेल करीत होते, हे सिद्ध झाले.

ईमेल-एसएमएस बनावट असू शकतात...
‘फिशिंग’द्वारे फसवणूक झाल्यास पोलिस गुन्हेगारांपर्यंत पोचणे पूर्वी अशक्‍य होते; मात्र आता ते शक्‍य झाले आहे. त्यासाठी देश-विदेशापर्यंत प्रयत्न करावे लागतात. यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. फोनवरून किंवा ई-मेलवरून कोणतीही माहिती कोणालाही, बॅंक अधिकाऱ्यांना देऊ नका. अशा ई-मेलला उत्तरही देऊ नका. आरबीआयच्या नियमानुसार बॅंक तुमच्याकडून कोणत्याही परस्थितीत ई-मेल अथवा फोनवरून कोणतीही माहिती घेत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com