वारसा स्थळे संवर्धनासाठी सर्वतोपरी साह्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोल्हापूर - ‘‘शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे जागतिक दर्जाची सर्वश्रेष्ठ मूल्ये आहेत. ही स्थळे जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वारसा स्थळांचा परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे त्या वास्तूंशी आपले नाते जोडण्याचे काम आज ‘सकाळ’च्या पुढाकारामुळे होत आहे. शहरातील सर्व वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न करू’’, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

कोल्हापूर - ‘‘शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे जागतिक दर्जाची सर्वश्रेष्ठ मूल्ये आहेत. ही स्थळे जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वारसा स्थळांचा परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे त्या वास्तूंशी आपले नाते जोडण्याचे काम आज ‘सकाळ’च्या पुढाकारामुळे होत आहे. शहरातील सर्व वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न करू’’, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

‘सकाळ’ व कोल्हापूर महापालिकेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त शहरातील २३ वारसा स्थळांची स्वच्छता मोहीम आज घेण्यात आली. या मोहिमेच्या समारोपप्रसंगी भवानी मंडपात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर हसीना फरास, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, आमदार सतेज पाटील, संयोगिताराजे छत्रपती, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे व्यासपीठावर  उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘आपल्या शहरात ऐतिहासिक महत्त्व आहे. हे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या वास्तू या ठिकाणी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. एकेक वास्तू आपली मूल्ये सांगत आहेत. ‘सकाळ’ने आपली सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी पुढाकार घेतला आणि या पुढाकाराला लोकांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आज शहरातील वारसा स्थळांविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती तयार होत आहे. आज स्वच्छता मोहीम घेतल्याने आता जबाबदारी आणखी वाढली आहे. यासाठीच आता या वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊ यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ.’’

सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘आपण आपले घर स्वच्छ ठेवतो; परंतु सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे, याचे भान ठेवत नाही. या स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी आणि लोकांना या वारसा स्थळांच्या संस्कृतीची जाणीव करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. ‘सकाळ’ने लोकांना बरोबर घेऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पंचगंगा वाचवूया’, ‘रंकाळा बचाव’ असे अनेक उपक्रम राबवले. लोकांनी या उपक्रमाचे स्वागत केलेच; परंतु  त्याचा पाठपुरावा लोकांनीच ठेवला आणि ती एक लोकचळवळ बनली. ‘सकाळ’वर लोकांनी दाखवलेल्या विश्‍वासार्हतेचा तो एक भाग आहे.’’ 

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले,  ‘‘सकाळने राबवलेला उपक्रम स्तुत्य असून, यामुळे आता लोकांवरील जबाबदारी वाढली आहे. वारसा स्थळांची स्वच्छता आपण सर्वांनी ठेवली पाहिजेच, परंतु शहर हे स्वच्छ सुंदर असले पाहिजे. शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभी केली पाहिजे. वारसा स्थळांची स्वच्छता झाल्यामुळे आता त्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.’’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती करण्याची गरज आहे. युवा पिढीमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव अधिक प्रकर्षाने आहे. कचरा कोठेही फेकायचा नाही, तो कचरा कुंडीतच गेला पाहिजे, यासाठी ही पिढी आग्रही आहे. वारसा स्थळांच्या देखभालीसाठी स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. रस्त्यात कोठेही किंवा वारसा स्थळांच्या परिसरात कचरा दिसल्यास तो उचलून पटकन कचरा कुंडीत टाकला पाहिजे,’’ अशी जाणीव प्रत्येक नागरिक, युवकांमध्ये झाली पाहिजे. 

महापौर हसीना फरास म्हणाल्या, ‘‘सकाळ आणि महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम निश्‍चित कोल्हापूरची शान वाढविणारा आहे. वारसा स्थळांची स्वच्छता ठेवून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. महापालिकेच्या वतीने यापुढे या स्थळांच्या देखभालीसाठी विशेष प्रयत्न केले जातील.’’ 

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘‘वारसा स्थळे ही शहाराची अस्मिता असतात. ती जपण्यासाठी नेहमीच सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहराच्या सौंदर्यात या वारसा स्थळांनी भर घालण्याचे काम केले असून, या स्थळांच्या संवर्धनासाठी महापालिका नेहमीच पुढाकार घेईल.’’

हेरिटेज समितीचे सदस्य उदय गायकवाड म्हणाले, ‘‘वारसा स्थळे ही नेहमीच आपले सर्वांचे स्फूर्तीस्थान आहेत. ती जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आज कोल्हापूरवासीयांनी आपण या वारसा स्थळांविषयी असलेली आपुलकी दाखवून दिली आहे. आता आपण २३ वास्तूंची सफाई केली आहे, पण शहरात ७४ वास्तू  वारसा स्थळांच्या ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी कचरा कुंड्या ठेवण्याची आवश्‍यकता आहे. शहर कचरामुक्त होऊन कोंडळामुक्त शहर कसे होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’  

या वेळी संयोगीताराजे छत्रपती, अपर जिल्हाधिकारी श्री. काटकर, प्रा. एस. पी. चौगुले, महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, महापालिकेतील सभागृह नेते प्रवीण केसरकर, परिवहन समितीचे माजी सभापती लाला भोसले, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक संजय मोहिते, जयश्री चव्हाण, ईश्‍वर परमार, अजित ठाणेकर, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, आर. के. पाटील, एस. के. माने, रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, निसर्गमित्रचे अनिल चौगुलेंसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी आभार मानले. 

ट्रॅफिक पोलिसांचे सहकार्य...
‘चला, जपूया मातीचा वारसा’ या ऐतिहासिक वास्तू स्वच्छता मोहिमेसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचेही सहकार्य लाभले. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह १४ पोलिसांनी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योगदान दिले. सकाळी साडेसहापासून दुपारी एकपर्यंत सर्व वाहतूक शाखेचे कर्मचारी तळमळीने कार्यरत होते. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत भुजबळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मोहिमेसाठी भवानी मंडप येथे योगदान दिले.

५ लाखांचा निधी
आमदार सतेज पाटील यांनी वारसा स्थळांचे संवर्धन आणि कचरा कुंड्या बसविण्यासाठी ५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा या ठिकाणी केली. वारसा स्थळे पर्यटन केंद्रे बनवणे आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता राहावी, यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असल्याचे त्यांनी  या वेळी सांगितले.

दादा आपल्‍यासाठी मुख्यमंत्रीच...
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या भाषणात कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्री श्री. पाटील नेहमीच प्रयत्न करत असल्याचे सांगून  विकासकामांसाठी निधीची कधी कमतरता भासत नाही. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या कामाचा झपाटा पाहता ते आपल्यासाठी मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.

फोटो गॅलरी