कर्जमाफी प्रकरणी तीन संस्थांचे सचिव निलंबित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कर्जमाफीच्या कामात हयगय केल्याचा ठपका ठेवून तीन विकास सोसायटींच्या सचिवांना आज निलंबित करण्यात आले. याशिवाय याच कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल ७६ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून जिल्हा बॅंकेचे दोन तालुका अधिकारी व दोन बॅंक निरीक्षक यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर - कर्जमाफीच्या कामात हयगय केल्याचा ठपका ठेवून तीन विकास सोसायटींच्या सचिवांना आज निलंबित करण्यात आले. याशिवाय याच कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल ७६ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून जिल्हा बॅंकेचे दोन तालुका अधिकारी व दोन बॅंक निरीक्षक यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा देखरेख संघामार्फत ही कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर कर्जमाफीसाठी दाखल झालेल्या अर्जांचे लेखापरीक्षण वेळेत न झाल्यास लेखापरीक्षकांवरही कारवाईचा इशारा दिला आहे.

निलंबित केलेल्या सचिवांत आळवे (ता. पन्हाळा) संस्थेचे सरदार बळवंत पाटील, तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) संस्थेचे दशरथ भरमू पन्हाळकर व यळगूड (ता. हातकणंगले) येथील सचिन आत्माराम गोटखिंडे यांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेने गडहिंग्लज व गगनबावडा तालुक्‍यातील विभागीय अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे. 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले आहेत. या अर्जाचे लेखापरीक्षण युद्धपातळीवर सुरू असून लेखा परीक्षण झालेल्या अर्जातील १ ते ६६ कॉलमची माहिती भरण्यासाठी जिल्हा बॅंकेत आयटी विभागात धांदल सुरू आहे. उद्यापर्यंत ही माहिती संगणकात भरण्याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. तर लेखापरीक्षकांना या अर्जांचे लेखापरीक्षण करण्याची मुदत कालपर्यंत होती, तरीही काही लेखापरीक्षकांकडून हे काम पूर्ण झाल्याने अशांना कारणे दाखवा 

नोटीस बजावली आहे. 
निलंबित केलेल्या तीन सचिवांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी कामात प्रगती न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. इतर ७६ संस्थांतील सचिवांचे कामही समाधानकारक न आढल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हा बॅंकेचे गडहिंग्लज व गगनबावडा तालुका अधिकारीही यात निष्क्रिय ठरल्याने त्यांना बॅंकने त्यांच्यावरही कारवाईचा इशारा एका नोटिशीद्वारे दिला आहे.

शुक्रवारपर्यंत काम पूर्ण
जिल्ह्यात कर्जमाफीसाठी २ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांचे लेखापरीक्षण होऊन त्यातील १ ते ६६ कॉलमची माहिती संगणकाद्वारे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा बॅंकेत ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व अर्जांचे लेखापरीक्षण आज पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. तर संगणकात माहिती भरण्याचे काम सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे. शुक्रवारपर्यंत हे कामही पूर्ण होईल, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.