शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासह इतर मागण्यांवर सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र बंदनंतर आज टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चाल करत मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला, तर करवीर तहसील कार्यालयास महाराष्ट्र किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर टाळेबंद आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. 

दरम्यान, पणन आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून मंत्रिपद घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माणिक शिंदे यांना पोलिसांनी अटक केली. शिंदे यांना कालही अशाच पद्धतीने अटक करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांना पोलिस ठाण्यातच ठेवण्यात आले होते. त्यामुळे आज पुन्हा अटक केल्यामुळे संघटना अधिकच आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या पोलिसांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, सातबारा कोरा करावा, अन्यथा सरकारला याच्यापुढे उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे सांगितले. 

करवीर तहसील कार्यालयावर महाराष्ट्र किसान सभेने सरकारच्या विरोधात टाळे ठोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी किसान सभेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

दरम्यान, सरकारने वेळेत तोडगा काढला नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी अजित पाटील, गुणाजी शेलार, बाळासाहेब मिरजे, मकरंद कुलकर्णी, गोरख चंदनशिवे, राजू खुर्दाळे, प्रशांत पाटील, पी. आर. पाटील, के. बी. खुटाळे, मोहन चौगुले, विष्णू सणगर व दिलीप करंबळे उपस्थित होते.

पोलिस-कार्यकर्ते झटापट
घोषणा देतच कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना टाळे लावू दिले नाही.