इंधन दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजीत काँग्रेसचा सायकल मोर्चा

पंडित कोंडेकर
शुक्रवार, 25 मे 2018

इचलकरंजी - सातत्याने केल्या जात असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल मोर्चा काढण्यात आला.  मलाबादे चौकात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य सरकारच्या निषेध नोंदवला.

इचलकरंजी - सातत्याने केल्या जात असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल मोर्चा काढण्यात आला. मलाबादे चौकात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य सरकारच्या निषेध नोंदवला. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सर्वसामान्यांचे बजेटच कोलमडून टाकले आहे. कर्नाटक निवडणूक काळात रोखण्यात आलेली पेट्रोल आणि डिझेल दरवाढ झाल्याने आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली असल्याची टीका शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी  केली.

महागाईने त्रस्त जनता मेटाकुटीला आली असताना गत दहा दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करुन सर्वसामान्यांना जगणे मुश्किलीचे केले आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेची लुट करणार्‍या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला. 

राजर्षि शाहु महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गावरुन मोर्चा  मलाबादे चौकात आला. त्याठिकाणी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अहमद मुजावर, किरण कटके यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रकाश मोरे यांनी, सत्तेत येण्यापूर्वी भाजपकडून पेट्रोल, डिझेल दरवाढीसंदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली. सर्वसामान्यांना महागाई कमी करण्याचे गोंडस गाजर दाखविले गेले. मात्र, सत्ता मिळताच प्रत्यक्षात काय झाले? याचे चित्र समोर आहे.  इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरु असून सामान्य नागरिकांची लूटमार थांबणार कधी, असा सवाल केला.

 

Web Title: Kolhapur News congress agitation against Petrol rate hike