आमदार सतेज पाटील - हसन मुश्रीफ यांच्याकडून नगरसेवकांची कानउघाडणी

आमदार सतेज पाटील - हसन मुश्रीफ यांच्याकडून नगरसेवकांची कानउघाडणी

कोल्हापूर - ‘‘आघाडीच्या बैठकीत जी चर्चा होते, त्याची गैरसमजातून महापालिका चौकात जाहीर चर्चा करू नका,’’ या शब्दात महापालिकेतील दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांची नेत्यांनी कानउघाडणी केली.

महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवानंतर आघाडीत निर्माण झालेले अविश्‍वासाचे वातावरण, या घडामोडीत स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्यावर घेतलेला संशय आणि त्यातून राष्ट्रवादीचे नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी पक्ष सोडण्याची दिलेली धमकी या पार्श्‍वभूमीवर आघाडीच्या नेत्यांनी आज दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची मते जाणून घेतली. 

दरम्यान, या वेळी नगरसेवकांनी कारभाऱ्यांविरोधातच तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते. ‘स्थायी’ सभापती निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीच्या सौ. मेघा पाटील पराभूत झाल्या. ‘स्थायी’ तील राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी विरोधात मतदान केल्याने 
सौ. पाटील  यांचा पराभव झाला. त्यानंतर महापालिकेतील राजकारण उफाळून आले आहे.

या घडामोडीत स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्यावर संशय व्यक्त होत होता, पण त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या घडामोडीशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला. त्यानंतरही प्रा. पाटील यांच्यावर पडद्याआडून आरोप होऊ लागल्याने शनिवारी (ता. २४) मुरलीधर जाधव यांनीच पक्ष सोडण्याची धमकी दिली. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक झाली. 

सुरवातीला श्री. मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील यांची बंद खोलीत चर्चा झाली. सुमारे अर्धा तास ही बंद खोलीतील चर्चा सुरू होती.

‘स्थायी’ निवडीत घडलेल्या घडामोडींबाबत दोन्ही आमदारांनी प्रा. पाटील यांची बाजू ऐकून घेतली. ही चर्चा झाल्यानंतर प्रा. पाटील बाहेर आले. त्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांशी श्री. मुश्रीफ व श्री. पाटील यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. नगरसेविकांसोबत त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींनाही आत सोडण्यात आले. काही नगरसेवक मात्र स्वतंत्रपणे भेटले, त्यात सुभाष बुचडे, नंदकुमार मोरे, भूपाल शेटे आदींचा समावेश होता. महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी होते. 

अधिवेशनानंतर बैठक
उद्यापासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असून, त्यासाठी आज रात्री आमदार मुश्रीफ व सतेज पाटील रवाना झाले. पुढच्या शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी बैठक घेण्याचे, तर अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे आश्‍वासन या दोन नेत्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com