विनापरवाना व्यवसायांना कोल्हापूर महापालिका ठोकणार सील - आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - शहरात विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांना दहा दिवसांत ‘सील’ ठोकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिले. आयुक्तांनी परवाना विभागाचा आढावा घेतला. परवानाधारकांचे दोन वर्ग केले. त्याची माहिती परवाना विभागाने दिली आहे. 

कोल्हापूर - शहरात विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांना दहा दिवसांत ‘सील’ ठोकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिले. आयुक्तांनी परवाना विभागाचा आढावा घेतला. परवानाधारकांचे दोन वर्ग केले. त्याची माहिती परवाना विभागाने दिली आहे. 

यात पहिल्या वर्गात जवळपास दोन हजार ६०२ व्यावसायिकांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही. त्यांच्याकडून ७३ लाखांची थकबाकी येणे बाकी आहे. अशांना थकबाकी भरून परवाना नूतनीकरण करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. दुसऱ्या वर्गात परवाना विभागाकडील ४१ व्यवसाय प्रकारांपैकी तीन हजार २९७ परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही. त्यांच्याकडून एक कोटी ४७ लाख थकबाकी येणे बाकी आहे. ‘बी’ आणि ‘डी’ वॉर्डमधील परवानाधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. ‘ए’, ‘सी’ व ‘ई’ वॉर्डातील परवानाधारकांना नोटीस बजावण्याचे काम सोमवार (ता. ६) पासून सुरू होणार आहे. तसेच, परवाना नूतनीकरण न केलेले व विनापरवाना व्यवसाय ‘सील’ करण्याचे आदेश परवाना विभागाला दिले.

शहरात औद्योगिक कारखाने, लॉजेस, थिएटर, पेट्रोलपंप, स्टेशनरी दुकाने, सराफ व्यापारी, फर्निचर, कापड दुकाने, तसेच इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी व्यवसाय चालतात. यांपैकी अनेक दुकानांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही, तसेच अन्य काही व्यवसाय विनापरवाना चालतात. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

यादी तयार
वास्तविक, परवाना नूतनीकरणाची मुदत एप्रिलपर्यंत असते. त्यानंतर विलंब आकार घेऊन परवाना नूतनीकरण करता येते; मात्र त्याचा लाभ फार तर एक हजारांवर व्यावसायिकांनी घेतला. अन्य लोकांनी परवाना घेतलेला नाही. अशांना नोटिसा देण्यात आल्या. नोटिसा मिळाल्यानंतर परवाना नूतनीकरण केलेले नाही, अशांची दुकाने सील केली जाणार आहेत. विनापरवाना व्यवसाय सुरू केलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे.