स्वतंत्र जलसंधारण विभाग निर्मिती बारगळली

निवास चौगले
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कृषी विभागातून जलसंधारण विभाग स्वतंत्र करण्याचा निर्णय होऊन चार महिने झाले. कृषी विभागातील दहा हजार कर्मचाऱ्यांनीही आपण या विभागाकडे जाण्यास तयार असल्याचे विकल्प सादर केले; पण अजूनही हा विभाग स्वतंत्र झालेला नाही. या विभागासाठी स्वतंत्र मंत्री आहेत; पण प्रत्यक्षात विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू नसल्याने हा विभागच बारगळण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर - कृषी विभागातून जलसंधारण विभाग स्वतंत्र करण्याचा निर्णय होऊन चार महिने झाले. कृषी विभागातील दहा हजार कर्मचाऱ्यांनीही आपण या विभागाकडे जाण्यास तयार असल्याचे विकल्प सादर केले; पण अजूनही हा विभाग स्वतंत्र झालेला नाही. या विभागासाठी स्वतंत्र मंत्री आहेत; पण प्रत्यक्षात विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू नसल्याने हा विभागच बारगळण्याची शक्‍यता आहे. 

जमिनीची सुपीकता वाढवणे, त्यासाठी माती परीक्षणासह शेतकऱ्यांना मातीची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे यासाठी कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेला जलसंधारण विभाग वेगळा करण्याचा निर्णय झाला. ३१ मे २०१७ रोजी त्या संदर्भातील शासन आदेश निघाले. त्यानंतर कृषी विभागातून या विभागाकडे काम करू इच्छिणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून विकल्प मागवले. १५ जुलै हा विकल्प सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. 

या काळात कृषी विभागातील कृषी सहायकापासून ते तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी या दर्जाच्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांनी या विभागाकडे काम करण्याची तयारी दर्शवली. तशी लेखी मान्यताही त्यांनी दिली. सुरुवातीला या स्वतंत्र विभागालाच विरोध करून तिकडे काम करण्यास इच्छुक नसलेल्या या कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला. त्यासाठी काम बंद आंदोलनही झाले; पण सरकार या निर्णयावर ठाम राहिल्याने या कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. 

कृषी विभागातील दहा हजार व जलसंधारणाकडील पाच हजार अशा १५ हजार कर्मचाऱ्यांची या विभागाकडे नियुक्ती झाली. या विभागासाठी स्वतंत्र आयुक्तपदही निर्माण करून या विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे करण्याचा निर्णयही झाला; पण त्यानंतर एकही कागद पुढे सरकलेला नाही. कृषी विभागातून या विभागाकडे जाण्यासाठी विकल्प केलेले कर्मचारी अजूनही कृषी विभागातच काम करतात, तर जलसंधारण म्हणून ज्या कामांना मंजुरी द्यावी लागते, त्यासाठीची जिल्हा पातळीवरील पदेच निर्माण झालेली नाहीत. त्यामुळे अधिकारी कार्यरत नाहीत. परिणामी या कामांना मंजुरी मिळत नाही. 

पदोन्नती, वेतनश्रेणी प्रमुख अडथळे
कृषी विभागातून या विभागाकडे वर्ग होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदोन्नती व वेतनश्रेणी हे दोन प्रमुख अडथळे हा विभाग सुरू करण्यासाठी येत आहेत. कृषी विभागाप्रमाणेच या विभागात पदोन्नती मिळावी, अशी मागणी आहे. त्याला जलसंधारण विभागाकडील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा विरोध आहे. सेवाज्येष्ठता डावलली जाण्याची शक्‍यता गृहीत धरून जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच याला विरोध केला. या विभागाचा कार्यभार कॅबिनेट मंत्री म्हणून राम शिंदे यांच्याकडे आहे; पण प्रत्यक्षात विभागाचेच काम चालू नसल्याने मंत्री पातळीवरही या विभागाबाबत शांतताच आहे.