मनपाचा अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - महापालिकेने शिंगणापूर नाका येथील गवत मंडईत गेल्या ८ ते १० वर्षांपासून  सि.स.नं.१२७७ या जागेत असलेली ६ अतिक्रमणे आज उद्‌ध्वस्त केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. विरोध मोडून काढत महापालिकेने ही कारवाई केली. 

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज केलेल्या संयुक्त शिंगणापूर नाका, गवत मंडई येथील महापालिकेच्या सि.स.नं.१२७७ या जागेमध्ये प्रताप जाधव यांचे ३५ बाय १२ या मापाचे विट बांधकाम व मंगलोरी कौलारू घर, आनंदराव जाधव यांचे १० बाय २० चे पत्रा शेड, बाळासाहेब जाधव यांचे १९ बाय २७ जनावरांकरिता असलेले शेड, स्वप्नील जाधव यांचे १५०० चौरस फुटाचे पत्र्याचे शेड, रंजना लोहार यांचे ३३ बाय १६ चे शेड अशी अतिक्रमणे केली होती. ही अतिक्रमणे आज मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. 

या कारवाई वेळी मोठा विरोध झाला तरीही विरोध मोडून काढून सदरची अतिक्रमण कारवाई पूर्ण करण्यात आली. या वेळी लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनकडील मोठा पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

कारवाई उपशहर अभियंता एस. के. माने यांच्या मार्गदर्शनाखाली, कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अतिक्रमणप्रमुख पंडित पोवार, सर्व्हेअर तानाजी गेजगे, कनिष्ठ लिपिक नितीन चौगुले व पवडी, इस्टेट, विद्युत व अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी यांनी केली. कारवाईवेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.