तोतया चित्रपट निर्मात्याला जमावाचा चोप

तोतया चित्रपट निर्मात्याला जमावाचा चोप

कोल्हापूर - चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने मुलींची परदेशात विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी करत कर्नाटकातील एका तरुणाला पकडले. त्याला जमावाने बेदम चोप देत शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. ताराराणी चौक परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये आज दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, बंगळूर येथील एक तरुण गेल्या पाच दिवसांपूर्वी कोल्हापुरात आला होता. ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये तो सुरवातीला उतरला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी तो याच परिसरातील दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्यास 

गेला. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ४०७ त्याने बुकिंग केली. चित्रपटनिर्मात्यासह हॉटेलचा मालक आणि सॉफ्टवेअर कंपनीचा मालक असून, कोल्हापुरात शाखा काढणार असल्याचे हॉटेल व्यवस्थापकाला सांगितले. 

दरम्यान, त्याने राजारामपुरी परिसरात डान्स क्‍लास चालविणाऱ्या एका महिलेची ओळख काढली. त्याने आपण लो बजेट मराठी चित्रपट काढणार आहे. त्यासाठी अभिनेत्रीची गरज असल्याचे सांगितले. तिने क्‍लासमधील मुलींची त्यांना ओळख करून दिली. त्यातील काही जणांचे त्याने ऑडिशनही घेतले. त्यात त्यांना बोल्ड कपडे आणि दुबईला जाण्याची तयारी आहे का? असे प्रश्‍न केले. 

त्यापाठोपाठ त्या महिलेने त्या तरुणाची गंगावेस येथील कोरिओग्राफर अविनाश गायकवाड यांच्याशी ओळख करून दिली. तो तरुण त्यांच्या क्‍लासमध्ये गेला. तेथे त्याने काही मुलींची ऑडिशन घेतली. त्यात त्याने विचारलेल्या प्रश्‍नावर गायकवाड यांना शंका आली. त्यांनी इंटरनेटवर संबंधित तरुणाची माहिती काढली. त्यात त्याचे तीन वेगवेगळे पत्ते असून, बंगळूरमध्ये गुन्हा दाखल झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. 

त्यापूर्वी चिखली (ता. करवीर) येथे एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. तेथे प्रॉडक्‍शन मॅनेजर म्हणून अमोल कोळेकर हे काम पाहतात. त्यांच्याशी  ही त्या तरुणाने ओळख काढली. त्यांनाही चित्रपट निर्माते असल्याचे सांगून अभिनेत्रीसाठी मुलींची निवड करायची आहे, असे सांगितले होते. तसेच शहरात परिचय वाढवून त्याने अनेक मुलींचे ऑडिशन घेतले. त्यात त्यांना बोल्ड कपडे, अंगावरील व्रण, कुमारी की विवाहिता आहात, दुबई, सौदीत जावे लागेल, असे प्रश्‍न विचारले. त्याच बरोबर एका मुलीची निवड झाल्याचे सांगून तिचे बोल्ड फोटोही स्वतःच्या उपस्थितीत शूट केले. लवकरच चित्रपट सुरू होतोय. तुला दुबईला जावे लागेल, असे सांगितले. 

दरम्यान, गायकवाड यांनी कोळेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गेली दोन दिवस त्या तरुणावर वॉच ठेवला. खात्रीसाठी त्याच्याकडे दोन मुली ऑडिशनसाठी पाठवल्या. त्यांनाही त्या तरुणाने अश्‍लील प्रश्‍न विचारले. त्यामुळे तो भामटा असल्याची खात्री पटली. त्यानंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, अमोल कोळेकर, कार्यवाहक बाळा जाधव, कलाकार शुभांगी कोळेकर, अभिनेता अवधूत जोशी, रोहन स्वामी आदींसह सदस्य एकत्र आले. आज दुपारी त्यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन त्या तरुणाला बाहेर बोलवून घेतले. त्याच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. मात्र, त्याला एकाचेही उत्तर नीट देता येईना. 

दरम्यान, नागरिकांचा जमाव जमा झाला. त्यांनी चित्रपटात काम देतो, असे सांगून मुलींची दुबईत विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याला जमावाने बेदम चोप दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. काही ज्येष्ठांनी त्या तरुणाची सुटका केली. त्यानंतर त्याच्यासह अन्य दोघांना मोटारीतून थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

तीन पत्ते आणि गुन्हे दाखल  
चित्रपटनिर्माता असल्याचे सांगणाऱ्या भामट्याकडे तीन व्हिजिटिंग कार्ड सापडली. तसेच त्याचे इंटरनेटवर पुणे, इंदूर व बंगळूर असे तीन वेगवेगळे पत्ते आहेत. तसेच त्याच्यावर कर्नाटकात गुन्हा दाखल झाला असून, त्याचा पोलिस ठाण्यातील फोटोही असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 
मोटारीवरून संशय बळावला...

चित्रपटनिर्माता असल्याचे आणि मोठ्या कंपनीचा मालक असल्याचे सांगणारा तरुण प्रवासासाठी वापरत असलेली मोटार ही कोल्हापुरातील असल्याचे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याने ही भाडेतत्त्वावर घेतल्याचे स्पष्ट झाले. तसा त्याच्यावरील सर्वांचा संशय अधिक बळावला. 

तीस रूम बुकिंग 
चित्रपटनिर्माता असल्याचे भासवून  संबंधित तरुणाने एका सॉफ्टवेअर कंपनीची शाखा कोल्हापुरात काढत असल्याचे  हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले. त्याने थेट हॉटेलमालकाशी विचारणा करून छाप पाडली. त्याच्याकडील उंची बॅग आणि त्यावर विमानतळावरील लेबल चिकटवले होते. त्याचबरोबर त्याने ५ ते ७ जुलै दरम्यानच्या कार्यक्रमासाठी ३० रूम्सही बुक केल्या होत्या. चिखली येथील शूटिंगचा आधार चिखली (ता. करवीर) येथे एका मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. तेथे तो तरुण इतरांना घेऊन गेला. त्याने तेथील निर्माते, दिग्दर्शक यांना पुष्पगुच्छ देऊन आपण चित्रपट निर्माता असल्याचे सर्वांना भासवले.

चित्रपटातील ऑडिशनसाठी मुलांसोबत पालकांनी जावे. त्यापूर्वी संबंधित निर्माता, दिग्दर्शक याची माहिती करून घ्यावी. शंका वाटल्यास अखिल भारतीय चित्रपट महामंडळाशी संपर्क साधावा. 
- धनाजी यमकर उपाध्यक्ष ः अखिल भारतीय चित्रपट महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com