‘कॉल फ्रॅन्कर’ तुम्हाला उल्लू बनवू शकतो

लुमाकांत नलवडे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सायबर गुन्हेगारीचा विळखा अलीकडे वाढत आहे. पूर्वी थेट लोकांना भेटून फसवणुकीचे प्रकार होत होते, त्यात फसणारे माहिती असायचे, आता मोबाईलवरून पासवर्ड मागून किंवा थेट संगणकाच्या मदतीने फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. या ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारीने सामान्य त्रस्त आहेत. दोन दिवसांपूर्वी याच पद्धतीने शहरात सुमारे सव्वाकोटींची फसवणूक झाली. तसेच डॉक्‍टरांची शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाली. या पार्श्‍वभूमीवर या गुन्हेगारीचा आढावा घेणारी लेखमाला आजपासून...

कोल्हापूर -  केवळ साडेतीनशे रुपयांतील ‘कॉल फ्रॅन्कर’ ॲपच्या साहाय्याने तुमची कोणीही बदनामी करू शकतो, तुमच्याकडील पासवर्ड, युजर घेऊन आर्थिक फसवणूक करू शकतो. सायबर क्राईममधील हा एक नवा प्रकार लोकांबरोबरच  पोलिसांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावरून तुम्हीच ही फसवणूक करीत आहात, असे दाखविले जाते. प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती ‘कॉल फ्रॅन्कर’ ॲपच्या साहाय्याने तुमची फसवणूक करीत असतो. सायबर क्राईममधून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सावधान राहा, सतर्क राहा असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

समोरच्या ताईंबरोबर तो नेहमी वैचारिक, विवेकी बोलत होता. अचानक त्याच्या मोबाईलवरून ताईंना कॉल झाला. अश्‍लील संभाषण झाले. नको त्या पद्धतीने हिणविण्यात आले. ताईंना विश्‍वास बसला नाही. त्यांनी रागारागात थेट पोलिस ठाणे गाठले. तेथे समोरच्या तरुणाचा झालेला कॉल पोलिसांना स्वतःच्या हॅण्डसेटवर दाखविला. पोलिसांनी त्या तरुणाला ठाण्यात बोलावून घेतले. त्याला पाहताच पोलिस अधिकाऱ्यांनी ओळखले. या तरुणाने असा कोणताही प्रकार केला नसावा, असे त्यांना वाटले, तरीही पोलिसांनी त्याला चढ्या आवाजात सुनावले; मात्र तो शांतच राहिला.

पोलिस अधिकाऱ्याला महत्त्वाचे काम असल्यामुळे ते तातडीने रवाना झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा संबंधित ताई आणि त्या तरुणाला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तेव्हा हा कारभार त्या तरुणाने केला नसल्याचे उघड झाले. त्याचा मोबाइलचा क्रमांक वापरून अन्य कोणीतरी व्यक्तींनी ताईंशी अश्‍लील संवाद साधल्याची माहिती पुढे आली. यानंतर ताईंनी त्या तरुणाची क्षमा मागितली; पण हे घडले कसे? ऑनलाईन असलेल्या ‘कॉल फ्रॅन्कर’च्या माध्यमातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली.

काय आहे कॉल फ्रॅन्कर?
साधारण साडेतीनशे रुपयांना हे ॲप मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या ॲपमध्ये दोन क्रमांकासाठी जागा असते. वरील जागेत एक क्रमांक द्यायचा. खालील जागेत एक क्रमांक द्यायचा आणि कॉल लावायचा. खालील क्रमांकावरून वरील क्रमांकावर कॉल गेला आहे, असे दिसून येते. त्रयस्त व्यक्तीच तो कॉल हाताळते. साडेतीनशे रुपयांच्या या ॲपमध्ये किमान अशाप्रकारचे दहा कॉल होतात. यामध्ये तुमचा क्रमांक दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये ज्या नावे ‘सेव्ह’ आहे, त्याच नावाने तो कॉल होतो. त्यामुळे तुम्ही कॉल केला नसला तरीही समोरील व्यक्तीच्या मोबाइलमध्ये तुमचा क्रमांक दिसतो.

चुकीचा उपयोग कसा होतो...
एखादी दंगल घडवून आणण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. ब्लॅकमेल करण्यासाठी असा उपयोग होऊ शकतो. एखाद्याबाबत गैरसमज करून देण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. बॅंकेतून बोलतो, असे सांगून बॅंकेच्या क्रमांकावर याद्वारे आर्थिक फसवणूक होऊ शकते.

सतर्क राहा...
एखाद्या कॉलमधील संभाषण संशयास्पद वाटल्यास तातडीने कॉल बंद करा. पुन्हा संबंधित व्यक्तीस कॉल करा. यावरून त्याची शहानिशा होईल. किंबहुना कॉल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला कॉल करून झालेल्या संभाषणाची खात्री करा. शक्‍यतो अशा कॉलमध्ये पासवर्ड, युजर व इतर माहिती न देणेच योग्य आहे.

 

Web Title: kolhapur news cyber crime report