उत्पादकांना रोज १० लाखांचा फटका

सुनील पाटील
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  जिल्हा सहकारी दूध संघाकडून (गोकुळ) गाय दुधाच्या प्रतिलिटर मागे २ रुपये कपात केली. एकीकडे डिबेंचर्ससाठी म्हणून दूध फरक बिलातून शेतकऱ्यांची अार्थिक गळचेपी केली. आता गाय दूध दर कपात करून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले आहे. गायीच्या प्रतिलिटरमागे २ रुपये दर कपात केल्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवसाला १० लाख ते ११ लाखांचा फटका बसणार आहे.

\जिल्ह्यातील दूध संस्थांच्या माध्यमातून गोकुळकडे वर्षाला सुमारे १९ ते २० कोटी लिटर गायीचे दूध संकलन होते. दिवसाला सरासरी पाच ते सहा लाख लिटर दूध संकलित केले जाते. आता प्रतिलिटरमागे २ रुपये कपात केल्याने दहा ते बारा लाखांचा दररोजचा फटका सहन करावा लागणार आहे. दूध उत्पादकांचा संघ, उत्पादक जगला पाहिजे, अशी भाषणबाजी केली जाते; पण याच शेतकऱ्यांना गोड बोलून अडचणीत आणण्याचे काम केले जाते. स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी आणि ज्येष्ठ म्हणून घेणारे अनेक संचालक तोंडावर पट्टी बांधून आहेत. 

जिल्ह्यात गोठा पद्धत करून गाय-म्हैस पाळून आपला चरितार्थ चालविणारे अनेक तरुण आहेत. त्यांना दिवसाला सुमारे शंभर रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. गोकुळने या आधी दूध फरकातील १९ कोटी रुपये काढून घेऊन दूध उत्पादकांचे ऐन दिवाळीत दिवाळ काढले. 

दूध फरकातील डिबेंचर्ससाठी प्रतिलिटरमागे ५५ पैसे घेऊन पाच लाख उत्पादकांचे तब्बल १९ कोटींहून अधिक रुपये संघाने काढून घेतले. हे पैसे कशासाठी, कोणासाठी, घेतले तर त्याचे व्याज संस्थेला मिळणार, की सभासदांना मिळणार, याचा काही पत्ता नाही. संघाच्या संचालकांना जाब विचारावा, तर वार्षिक सभा गुंडाळली जाते. यातच आता गाय दुधाचे दर कपात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

हे वास्तव लक्षात घेणार का? 
दूध उत्पादकांच्या जीवावर गावागावांत साध्या कौलाच्या घरात सुरू असलेल्या दूध संस्थांच्या मोठमोठ्या इमारती झाल्या. या संस्थांच्या जोरावर गोकुळची अब्जावधीची उलाढाल होते. संघातील कारभारीही गब्बर झाले; मात्र वर्षानुवर्षे शेण घाण काढणाऱ्या दूध उत्पादकाला अजूनही गोठ्यात पडलेल्या खड्ड्यात मुरूम टाकण्याएवढाही सबळ नाही.