‘गोकुळ’ला रोज १६ लाखांचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  म्हशीच्या तुलनेत गायीचे दूध वाढल्याने जिल्हा दूध उत्पादक संघाला (गोकुळ) दररोज १६ लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दूध पावडर व लोणी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी बंद केलेली गायीच्या दुधाची खरेदी, बाजारात दूध पावडरचे घसरलेले दर आणि अलीकडे म्हैस दुधापेक्षा गायीच्या दुधाचे वाढलेले संकलन, याचा मोठा सामना ‘गोकुळ’सह जिल्ह्यातील संघांना करावा लागत आहे. 

दरम्यान, गायीच्या दूध संकलनामुळे संघाला तोटा होत असला, तरी खरेदी दरात कोणतीही कपात केलेली नाही; पण भविष्यात हीच परिस्थिती राहिली, तर दर कमी केले जाण्याची भीती आहे. त्याचा फटका उत्पादकांना बसणार आहे. चार फॅटच्या गायीचे दूध संघाकडून प्रतिलिटर २८.५० रुपयांनी खरेदी केले जाते. याशिवाय प्रतिलिटर संस्थेला १.२० मॅनेजमेंट खर्च व १.०५ रुपये बोनस दिला जातो. मॅनेजमेंट व बोनस वगळून संघाला दररोज १६ लाख रुपये तोटा सहन करावा लागतो. 

‘गोकुळ’कडे सध्या दररोज गायीचे ६ लाख ७५ हजार, तर म्हशीचे ६ लाख २२ हजार लिटर दूध संकलित होते. पूर्वी एकूण संकलनात म्हैस दुधाचा वाटा ७० टक्के, तर गाय दूध ३० टक्के संकलित होत होते. अलीकडे म्हैस दुधापेक्षा गाय दुधाचे संकलन जास्त आहे. ‘गोकुळ’चे मुंबईचे संपूर्ण मार्केट हे म्हैस दुधावर अवलंबून आहे. एकट्या मुंबईत ‘गोकुळ’च्या म्हैस दुधाची दररोज ४.५० लाख लिटर विक्री होते. 

सध्या हे मार्केट ताब्यात ठेवण्यासाठी संघाला इतर जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकातूनही म्हैस दूध खरेदी करावे लागते. गाय दुधाच्या एकूण संकलनापैकी दोन लाख ७५ हजार लिटर दुधाची पावडर, तर दोन लाख लिटर दुधाचे लोणी तयार केले जाते; पण देशांतर्गत बाजारात दूध पावडरचे दर १७५ रुपये प्रतिकिलो एवढे खाली आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क व युरोपच्या तुलनेत हे दर फारच कमी आहेत. देशात दर कमी असले तरी त्याची मागणी ठप्प आहे.

लोणी प्रतिकिलो २७५ रुपये दराने देशात विकले जाते. अलीकडे लोणी व दूध पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांनीच गायीच्या दुधाची खरेदी बंद केली. ‘गोकुळ’ स्वतः हे उत्पादन करत असले तरी त्याचा बाजारात दर तर कमी आहेच; पण मागणीही ठप्प आहे. अशा परिस्थितीत संघाला होणारा तोटा भरून काढणे अशक्‍य आहे.  

Web Title: Kolhapur News Daily 16 lakh rs loss in Gokul