दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -​दिवाळीऐवजी दसऱ्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

शिवसेनेची मागणी ः जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; सर्व आमदार उपस्थित

कोल्हापूर - दिवाळीआधी कर्जमाफीची रक्कम देण्यासाठी शिवसेनेने राज्यभर आंदोलन आणि मोर्चा काढण्याचे जाहीर करताच शासनाने हा निर्णय मान्य करून तशी घोषणाही केली. मात्र आता दिवाळीऐवजी दसऱ्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.  

राज्य सरकारने शिवछत्रपतींच्या नावे शेतकरी कर्जमुक्त योजना सुरू केली; पण तीन महिने होऊनही अद्याप किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला, हे जनतेसमोर आलेले नाही. दसऱ्यापर्यंत शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा म्हणून मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारने दसऱ्यापूर्वी रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी करीत हा मोर्चा काढला. 

या वेळी अरुण दुधवडकर म्हणाले, की कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना गोंधळात टाकले आहे. प्रत्येक दिवशी नवा जीआर काढून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. आता दोन महिने झाले तरीही अजून कर्जमाफीचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी, अशी शिवसेनेने मागणी केली होती. तसेच, राज्यभर शिवसेनेतर्फे आंदोलन करून मोर्चा काढण्याचीही घोषणा केली होती. मात्र, मोर्चे निघण्याआधीच शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम देण्याचे जाहीर केले. आता दसऱ्यापूर्वीच कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा झाली पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. 

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही शिवसेनेची प्रमुख मागणी होती. यासाठी वारंवार मोर्चे काढले होते. आता शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही त्याची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. या वेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.