कर्जमुक्ती आंदोलन मेळावा यशस्वी करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

कोल्हापूर - कर्जमाफीसाठी नियम आणि अटी घालून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप आज कर्जमुक्ती आंदोलन मेळाव्याच्या तयारीच्या बैठकीत केला. २२ जुलैला संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलन मेळावा येथे होत असून, तो यशस्वी करण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त झाला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. 

२२ जुलैला शाहू सांस्कृतिक सभागृहात दुपारी एक वाजता मेळाव्यास सुरवात होईल. या वेळी सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील (शेकाप) यांच्यासह समिती सदस्य मार्गदर्शन करणार आहेत. गावोगावी सभा, तसेच तालुकानिहाय बैठका घेण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. बाबासाहेब देवकर, भगवान काटे, माणिक शिंदे, उदय नारकर, प्रा. सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, आरम मुजावर, भारत पाटील आदी उपस्थित होते.

संपतराव पाटील म्हणाले, ‘‘कृषिमूल्य आयोगाची नियुक्ती निव्वळ धूळफेक आहे. केंद्राच्या आयोगाने काय दिवे लावले, ते आता राज्याचा आयोग लावणार आहे? आयोग 

नेमूनही पूर्वी आधारभूत किंमतही मिळाली नाही. ऑनलाईन सात-बाऱ्यावर कुळाच्या नोंदी कमी करणे यासह शेतकऱ्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.’’

बाबासाहेब देवकर यांनी कर्जमाफीसंबंधी रोज नवा अध्यादेश काढून दिशाभूल सुरू आहे. जिल्हा मेळाव्याला सेवा सोसायटीच्या सचिवांनाही सहभागी करून घेऊया. त्यामुळे नेमके चित्र पुढे येईल, असे सांगितले.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सुरवातीला संप फोडायचा प्रयत्न केला. पालकमंत्री पाटील यांनी तत्त्वतः कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. सुकाणू समितीने संपूर्ण कर्जमाफी आणि सात-बारा कोरा होण्यासाठी आंदोलन छेडले आहे. त्यास कोल्हापूर जिल्ह्यातून पाठिंबा देण्याचा निर्धार विविध वक्‍त्यांनी केला.