सतर्कतेने टाळा डेंगी, हिवताप, चिकुनगुनिया

सुनील पाटील
गुरुवार, 8 जून 2017

कोल्हापूर - पावसाळा सुरू होतोय. पावसाचे पाणी साठून डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. ही उत्पत्ती वेळेत थांबवली नाही तर हिवताप, डेंगी व चिकुनगुनियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या पाहिजेत. 

कोल्हापूर - पावसाळा सुरू होतोय. पावसाचे पाणी साठून डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. ही उत्पत्ती वेळेत थांबवली नाही तर हिवताप, डेंगी व चिकुनगुनियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या पाहिजेत. 

आरोग्य अधिकाऱ्यांचे काम
ताप असणाऱ्या रुग्णांचे हिवतापासाठी रक्त नमुने   संकलन करून तपासणी केली पाहिजे.
हिवताप असणाऱ्या रुग्णास सर्व उपचार देणे.
संशयित डेंगी, चिकुनगुनिया रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी सेंटिनल सेंटरला पाठविले पाहिजे.
डेंगीसह इतर रोगांसाठी प्रतिबंधक उपाययोजना केल्या पाहिजेत. 
सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य हवे
पाऊस कधीही सुरू होऊ शकतो. प्रत्येक शहरातील आणि गावागावांतील तरुण मंडळांसह महापालिका, नगरपंचायत, नगरपालिकेसह ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे. शहरात तसेच गावात असणारी डबकी, खड्डे बुजवली पाहिजे. रस्त्यावर असणारी काटेरी वनस्पती व झुडपे तोडून परिसर स्वच्छ केला पाहिजे. 

पाणी उकळून आणि गाळून प्या
पावसाळ्यात ग्रामीण भागात पुरामुळे पाणी शुद्धीकरण कोलमडलेले असते. स्वच्छ आणि प्रक्रिया केलेल्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे ग्रामस्थांनीच काळजी घेऊन पाणी उकळून आणि गाळून घेतले पाहिजे. 

हेही लक्षात घ्‍या
२०१६ मध्ये जिल्ह्यातील वडणगे, बालिंगा (ता. करवीर) येथे मलेरिया झाला होता. कारिवडे, बाजार भोगाव, करंगळे, कणेरी, महागाव, वारूळ, कसबा बावडा, साने गुरुजी वसाहत व ताराबाई पार्क येथे १३ जणांना डेंगीची लागण झाली होती. याव्यतिरिक्त इचलकरंजी (ता. हातकणंगले) येथे डेंगीने चार जणांचा बळी घेतला. बामणी (ता. कागल) येथील १, कणेरी येथील १, वारूळ १ तर महापालिका हद्दीत २ अशा एकूण ९ जणांचा डेंगीने मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारी हाच यावरील उपाय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

पावसाळ्यात लोकांना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या पाहिजे. शासन पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही तशा सूचना दिल्या आहेत. स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे. तळी, डबकी, उघड्यावरील पाण्यावर आवश्‍यक औषध फवारणी किंवा गप्पी मासे टाकले पाहिजे, यासाठी स्थानिक पातळीवर महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच तरुण मंडळानीही यामध्ये सहभाग घ्यावा. 
- डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

डेंगीची लक्षणे
एडिस डास चावल्यामुळे डेंगी होतो. यामध्ये लोकांना खूप ताप येतो. अशक्तपणा येऊन चक्कर येते. चक्कर आल्यानंतर अनेक लोक बेशुद्ध होतात. तोंडाचा वास बदलतो. उलटी येते. डोकेदुखी, पाठदुखीसह अंगही खूप दुखू लागते. अशा वेळेला मेडिकलमधील गोळीवरच उपचार भागविणे धोकादायक ठरू शकते. यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला व औषध घेणे 
आवश्‍यक आहे. 

डेंगी झालेल्या व्यक्तीला चावलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंगी होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच स्वच्छतेला लागणे कधीही चांगले ठरणार आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
कोणताही ताप आल्यास सरकारी दवाखान्यात जा. 
तिथेच रक्त तपासणीसाठी द्यावे. हे रक्त मोफत तपासले जाईल.
आपल्या घराभोवती पाण्याची डबकी बुजवावीत किंवा नष्ट करावी. 
डबके उघडे असल्यास त्यावर रॉकेल किंवा जळके तेल टाकावे.
सार्वजनिक आड, विहिरी, तलावात गप्पी मासे सोडावेत
घरातील पाण्याच्या टाक्‍या आठवड्यातून एकदा पूर्ण रिकाम्या कराव्यात.
घरातील पाणी नेहमी झाकून ठेवावे.
खिडक्‍यांना डासप्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात.
झोपताना अंग झाकून घेऊन झोपावे.
लहान मुलांना मच्छरदाणीत झोपवावे.
शौचालयाच्या व्हेंट पाईपच्या (गॅस पाईप) वरील बाजूस जाळी बसवा किंवा सुती कापड बांधले पाहिजे. 
जे पाणी पिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी नाही, अशा पाण्यावर टेमिफॉस हे कीटकनाशक टाकावे.