कोल्हापूर-शिर्डी रेल्वे येत्या बुधवारपासून - धनंजय महाडिक

कोल्हापूर-शिर्डी रेल्वे येत्या बुधवारपासून - धनंजय महाडिक

कोल्हापूर - "पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) मार्गावर रेल्वे येत्या बुधवारी (ता. 27) दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी येथून सुटणार आहे. बुधवारी दुपारी चार वाजता विशेष समारंभात ही गाडी सोडण्यात येणार आहे. "हॉलिडे स्पेशल' या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद मिळाला, तरच भविष्यात ही रेल्वे नियमित धावणार आहे,' अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. महाडिक यांनी दिलेली माहिती अशी ः गेली तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर पुणे येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. डी. शर्मा यांच्या बैठकीत कोल्हापूर-शिर्डी मार्गावर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला. येथील शाहू महाराज टर्मिनसवरून दुपारी साडेचारला सुटणारी रेल्वे गुरुवारी पहाटे 5.55 ला शिर्डी येथे पोचणार आहे. गुरुवारी शिर्डी येथून सकाळी 8.25 ला कोल्हापूरसाठी रेल्वे निघेल. ही रेल्वे त्याच दिवशी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता कोल्हापुरात पोचणार आहे. मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, नगर येथे तिला थांबे आहेत. 

रेल्वेला जनरल-6, स्लिपर कोच -7, वातानुकूलित डबे-2, द्वितीय श्रेणी-एक असे एकूण 18 डबे असणार आहेत. यात सर्वसाधारण तिकिटाचा दर 170; तर स्लिपर कोचचा 330 रुपये असेल. 

श्री. महाडिक म्हणाले, ""रेल्वे महाव्यवस्थापकांच्या बैठकीत कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वे मार्गाबाबतची सविस्तर चर्चा झाली आहे. येत्या सहा माहिन्यांत काम सुरू होईल. याशिवाय कोल्हापूर -अहमदबाद मार्गावर आठवड्यातून दोन वेळा रेल्वे सोडण्यात यावी, कोल्हापूर-जोधपूर मार्गावर रेल्वे सुरू करणे, कोल्हापूर-सोलापूर रेल्वे सकाळी सुरू करणे अशा मागण्याही या बैठकीत करण्यात आल्या. या वेळी पत्रकार परिषदेस स्थानक प्रबंधक सुग्रीव मीना, प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियानी, मोहन शेटे आदी उपस्थित होते. 

पर्यटनात वाढ होणार 
रेल्वे सल्लागार समितीचे समीर शेठ म्हणाले, ""शिर्डी रेल्वे सुरू झाल्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकही कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन करून शिर्डीला जाऊ शकतात. त्यामुळे येथील पर्यटनात वाढ होईल. रेल्वे सुरू होणे, हा खूप मोठा विषय असून, खासदार महाडिक यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न निश्‍चित कोल्हापुराच्या विकासात भर घालणारे आहेत.'' 

महालक्ष्मी-अंबाबाई वाद निरर्थक 
महालक्ष्मी एक्‍स्प्रेसचे नाव बदलून अंबाबाई एक्‍स्प्रेस करावे, अशी मागणी आहे. या प्रश्‍नावर खासदार महाडिक म्हणाले, ""महालक्ष्मी-अंबाबाई हा वाद निरर्थक आहे, असे माझे मत आहे. कोणी महालक्ष्मी म्हणावे की अंबाबाई म्हणावे, हा ज्याचा-त्याचा भावनेचा प्रश्‍न असल्याने अशा मुद्‌द्‌यावर वाद निरर्थक ठरतो.'' 

रेल्वे स्थानकावर नव्या सुविधा 
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म दोन व तीनवर लिफ्टची व्यवस्था होणार आहे. विक्रमनगर परिसरातील पादचारी पुलाचे रेंगाळलेले काम लवकरच सुरू होईल. त्यासाठी महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल. स्थानकात "हायफाय' सुविधा देण्यात येईल. रेल्वे गुडसच्या द्वारे येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या सर्व सुविधांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे श्री. महाडिक यांनी सांगितले. 

सर्वच डब्यांत सीसीटीव्ही 
"महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,' अशी मागणी खासदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. त्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने प्रतिसाद दिला आहे. देशातील रेल्वेत महिलांच्या डब्यासह सर्वच डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. लवकर सर्वच डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असेही श्री. महाडिक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com