धनगर आरक्षणासाठी विधानसभेला घेराओ - आमदार रामहरी रूपनर

धनगर आरक्षणासाठी विधानसभेला घेराओ - आमदार रामहरी रूपनर

कोल्हापूर - ‘‘धनगर समाजाला आरक्षण घटनेतच दिले आहे. ‘धनगड’ या शब्दात बदल होऊन ‘धनगर’ असा उल्लेख झाल्यामुळे अनुसूचित जातीसाठी लागू असलेले लाभ धनगर समाजाला मिळत नाहीत. हे लाभ मिळावेत, या मागणीसाठी लढावे लागेल. धनगर समाजाने आता विधान भवनाला घेराओ घालण्यासाठी सज्ज व्हावे’’, असे आवाहन आमदार रामहरी रूपनर यांनी केले. 

धनगर समाज महासंघ व मल्हार सेना व युवक संघटनेतर्फे मेळावा आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. 

श्री. रूपनर म्हणाले, ‘‘धनगर समाजाचा इतिहास मोठा आहे. मल्हारराव होळकर यांचा कंदाहारपर्यंत दबदबा होता, परंतु धनगर समाज स्वतःचा इतिहास सांगत नाही, वाचत नाही आणि ऐकतही नाही. त्यामुळे आपली बाजू मांडण्यात आपण कमी पडलो आहोत.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी व्यापक पातळीवर पाठपुरावा झाला होता, मात्र आपल्यातील काही गटांनी बारामतीत जाऊन आंदोलन केले. यामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावला. केंद्रीय अनुसूचित जातीच्या यादीत ‘धनगड’ असा उल्लेख असल्याने धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले गेले, मात्र वास्तव तसे नाही.’’

ते म्हणाले, ‘‘अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना घटना पुनर्विलोकन आयोग स्थापन केला होता तेव्हा २००२ मध्ये घटनेत काय दुरुस्ती असतील तर त्या सुचवा, असे आवाहन या आयोगाने केले होते. त्यानुसार ‘धनगर’ व ‘धनगड’ या शब्दाची दुरुस्ती करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन ५०० पुराव्यानिशी आयोगासमोर मांडणी केली होती. त्यानुसार धनगर हा शब्द बदलून आलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती. त्यानंतर ते भारतात आले. वकिली सुरू केली तेव्हा हरी पिराजी धायगुडे या धनगर समाजातील व्यक्तीने त्यांची पहिली मिरवणूक काढली होती.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचा अभ्यास केला होता. त्यानुसार त्यांनी घटनेत धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ दिला आहे. आता फक्त त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही चर्चा झाली आहे. त्यांनीही तसे पत्र देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.’’ 

धनगर समाजाने संघटितपणे आग्रह धरून सरकारवर त्यासाठी दबाव आणवा लागेल. यासाठी विधानभवनाला घेराओ घालायचा आहे. त्यासाठी हाक मारताच सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.   

मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन रानगे म्हणाले, ‘‘धनगर समाजाचा मोठा मतदार वर्ग आहे. त्यावर लक्ष ठेवून भाजपच्या नेत्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा केल्या.  आता मात्र आरक्षणाचा लाभ देण्यात टाळाटाळ केली आहे. यासाठी एकत्र येऊन पाठपुरावा करावा लागेल.’’ या वेळी राजाभाऊ डांगे, महिला आघाडीच्या पुष्पाताई मरवाडे, राघू हजारे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडी, नगरसेवक राजसिंह शेळके आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com