घनवट, चंदनशिवेकडून तपासात असहकार्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - वारणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यवधी रकमेच्या चोरी प्रकरणात शरण आलेल्या संशयित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट व सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्याकडून प्राथमिक तपासात सहाकार्य मिळाले नाही. मात्र संशयितांविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे "सीआयडी'चे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक डॉ. जय जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.

जाधव म्हणाले, 'वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमध्ये 12 मार्च 2016 रोजी झालेल्या कोट्यवधीच्या चोरीचा छडा सांगली पोलिसांनी लावला. यातील मुख्य संशयित मोहिद्दीन मुल्ला याला अटक केली. त्याच्याकडून तीन कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर कोडोली पोलिसांनी छापा टाकून आणखी दीड कोटीची रक्कम जप्त केली. चोरीला गेलेल्या रकमेबाबत फिर्यादी झुंझार सरनोबत यांनी शंका व्यक्त केली. याचा तपास अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केला. त्यात सांगलीच्या सात पोलिसांनी तपासाच्या नावाखाली 9 कोटी 13 लाखांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सातही जण गायब झाले.

न्यायालयात दिलेल्या वचननाम्यानुसार काल नवव्या दिवशी संशयित घनवट व चंदनशिवे हे दोघे गुरुवारी (ता.3) "सीआयडी'ला शरण आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्या दोघांना अटकेची प्रक्रिया सुरू केली. त्या वेळी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडून कोणतेच सहकार्य मिळाले नाही. सर्व संशयितांविरोधात ठोस पुरावे आहेत. तपासाअंती त्यात वाढ होत आहे. अटकेनंतर रात्री त्या दोघांची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. इतर संशयितांप्रमाणे त्यांना कोठडीत राहावे लागले.

अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकांची भेट -
सीआयडी'चे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक जय जाधव यांनी करवीर पोलिस ठाण्याला काल रात्री पावणेबाराच्या सुमारास भेट दिली. कोठडीतील घनवट आणि चंदनशिवे यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, याची माहिती त्यांनी घेतली. ते इतर संशयिताप्रमाणे कोठडीत एका सतरंजीवर झोपले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची "व्हीआयपी' वागणूक दिली जाते का? याकडे लक्ष देण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिस तेथे तैनात करण्यात आले.

घनवटला मधुमेहाचा त्रास...
घनवटला मधुमेहासह इतर आजारही आहेत. त्याला आवश्‍यक ती औषधे कस्टडीत डॉक्‍टरांच्या सल्ल्याने देण्याची मुभा देण्यात आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या त्याला त्रास जाणवू लागला. त्याने काहीतरी गोड अगर चहाची मागणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यास सुरवात केली होती.