डॉक्‍टरांच्या कर्तृत्व गाथा 

डॉक्‍टरांच्या कर्तृत्व गाथा 

वैद्यकीय पेशा हा वास्तविक अत्यंत व्यस्त जीवनशैली असलेला. असे असले तरी काही डॉक्‍टर वैद्यकीय सेवेबरोबरच कला, क्रीडा, नाटक, चित्रपट, समाजकारण, राजकारण इतकेचे नव्हे तर विविध प्रकारचे छंद जोपासून जीवनाच्या अनेकविध क्षेत्रात ठसा उमटवतात. साहजिकच त्यांच्या कर्तृत्वाच्या दिशाही व्यापक होतात. अशाच काही निवडक डॉक्‍टर मंडळींच्या या प्रातिनिधीक ऑफ बिट कर्तृत्व कथांचे सार आजच्या डॉक्‍टर्स डे निमित्त

गडकोटांचे सांगाती - डॉ. अमर अडके 
कोल्हापूर ः शिवरायांचा इतिहास जागवण्याचे कार्य करणारे डॉक्‍टर अशी डॉ. अमर अडके यांची ओळख आहे. सोमवार ते शनिवार दुपारपर्यंत दवाखान्यात रुग्णांवर उपचार करायचे आणि शनिवार दुपार ते सोमवार सकाळपर्यंत सह्याद्रीचे घाटमाथे, शिखरे, किल्ले फिरायचे हा छंद डॉ. अडके यांनी गेली 35 वर्षे अविरतपणे सुरू ठेवला आहे. यामध्ये ते निसर्गाची, इतिहासाची अनुभूती घेतात. किल्ल्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करतात. 454 किल्ले, 169 घाटवाटा ते पायी फिरले आहेत. यातून त्यांना आलेली अनुभूती, गडकिल्ल्यांची वैशिष्ट्ये, शिवरायांचे कार्य हे त्यांचे व्याख्यानाचे विषय आहेत. गडकोट माझे सांगाती, रानवाटा ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. किल्ले फिरल्याने शिवरायांच्या कार्याची प्रेरणा मिळते. शारिरीक क्षमतेचे कस लागतो त्याचबरोबर मनामध्ये विधायक भान निर्माण होत असल्याचे डॉ. अडके सांगतात. प्रत्येक किल्ला हा पर्यावरण पुरक असल्याचेही ते सांगतात. 

वर्षातून दोनदा शोधग्रामची वारी - डॉ. भिंगार्डे 
कोल्हापुरातील भूलतज्ञ डॉ. किरण भिंगार्डे म्हणजे समाजातील विविध घटकांसाठी सतत तत्पर असणारे. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या "सर्च' संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीतील आदिवासींसाठी सुरू असलेल्या कामातही ते सक्रीय आहेत. वर्षातून दोनदा मार्च आणि सप्टेंबरला ते गडचिरोलीत जावून तेथील आदिवासींना वैद्यकीय सेवा देतात. येत्या सप्टेंबरला त्यांची अठ्ठावीसावी वारी असेल आणि सुरवातीला ते एकटे जात असले तरी आता त्यांच्याबरोबरीने डॉ. महेश प्रभू, डॉ. नमिता प्रभू, डॉ. महावीर चौगुले, डॉ. निखिल सखदेव, डॉ. सचिन शिंदे या मंडळींनीही ही वारी सुरू केली आहे. प्रत्येक वारीतील तीन दिवसात ही मंडळी सव्वाशेहून अधिक रूग्णांवर उपचार करतात. डॉ. भिंगार्डे पन्हाळा-पावनखिंड मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना गेली पाच वर्षे "बेसीक लाईफ सपोर्ट' चे प्रशिक्षण देतात. मोहिमेत कुणाला हृदयविकार उद्‌भवल्यास त्यावर प्राथमिक उपचार कसे करावे आणि डॉक्‍टरांपर्यंत पोचवावे, याबाबतचे हे प्रशिक्षण असते. असे प्रशिक्षण घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळे आजवर अकरा जणांना जीवदान मिळाले आहे. 

नाट्यलेखनातून देतात संदेश 
(डॉ. सुषमा देशमुख, स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ, नागपूर.)

नागपूर ः स्त्रीचं आयुष्य ती जन्मापूर्वीच संपण्याचं सत्र सर्वत्र सुरू आहे. हे दुःख नाट्यातून मांडताना सोनोग्राफीतून लिंग तपासणी म्हणजे, खऱ्या अर्थाने आई संपवण्याची मानसिकता आहे, हा संदेश समाजासमोर डॉ. सुषमा देशमुख यांनी ठेवला. वैद्यकीय व्यवसायाचा मानवी चेहरा हरवत असताना त्यांचे काम समाजासाठी वरदान ठरत आहे. डॉ. सुषमा यांनी इन्फर्टिलिटी मॅनेजमेंट, हिस्टेरोस्कोपी या शैक्षणिक पुस्तकांसह मराठीत "स्त्री वंध्यत्व', स्त्री आरोग्य, स्त्री गर्भवती-सोनोग्राफी ही आरोग्य ज्ञान देणारी पुस्तके लिहिली. तर सखी आरोग्य या पुस्तकातून दहा एकांकिकांचे लेखन त्यांनी केले असून, या नाट्याचे प्रयोग सादर झाले आहेत. त्या म्हणतात की  रुग्णसेवेदरम्यान अनुभवातून जे काही मिळवता आलं. ते समाजाला नाट्यलेखन, सामाजिक लेखनाच्या माध्यमातून सांगू शकते, याचे मला समाधान आहे आणि ती सामाजिक जबाबदारी आहे.'-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com