शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "डोपिंग' टेस्ट

संदीप खांडेकर
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

शालेय खेळ महासंघाचा निर्णय : खेळाडूंवर करडी नजर, यंदापासून अंमलबजावणी

शालेय खेळ महासंघाचा निर्णय : खेळाडूंवर करडी नजर, यंदापासून अंमलबजावणी
कोल्हापूर - यंदापासून शालेय राष्ट्रीय व खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची डोपिंग चाचणी होणार आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीद्वारे (नाडा) ही चाचणी घेतली जाईल. शालेय राष्ट्रीय स्तरावरच खेळाडूंवर करडी नजर ठेवली जाणार आहे. शालेय खेळ महासंघाने शालेय स्पर्धेतून अकरा, चौदा, सतरा व एकोणीस वयोगटातील इयत्तेची अट वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत "ओव्हरएज' खेळाडू खेळविले जात असल्याचा आरोप होत राहिला आहे. ऐन पावसाळ्यात सुरू होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी मात्र जिल्हा क्रीडा कार्यालयांची तारेवरची कसरत असते. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरांवर होणाऱ्या या स्पर्धेत शालेय संघ चुरशीने सहभागी होतात. मात्र, या स्पर्धांतील राष्ट्रीय स्तरावर कधीच खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात आली नाही. यंदापासून मात्र डोंपिग चाचणी घेऊन एखादा खेळाडू उत्तेजक द्रव्य घेऊन मैदानात उतरतो का, याची पाहणी केली जाणार आहे. खेळाडूंवर वेळीच लगाम लावून त्यांना त्यांच्या अंगभूत कौशल्याद्वारे बक्षिसे मिळविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा त्यामागे विचार आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत वयोगट व इयत्तेचे एक समीकरण होते. त्यानुसार अकरा वर्षे वयोगटात खेळायचे असेल, तर खेळाडू तिसरी, चौथी किंवा पाचवीत असावा लागे. चौदा वर्षे वयोगटासाठी तो सहावी, सातवी आठवी, सतरा वर्षे वयोगटासाठी नववी व दहावी, तर एकोणीस वर्षे वयोगटासाठी अकरावी व बारावीत शिकत असावा लागे. थोडक्‍यात सांगायचे तर शालेय क्रीडा स्पर्धेतील यापूर्वीच्या नियमानुसार नववीतील खेळाडू सतरा वर्षे वयोगटात सहभागी होऊ शकत होता. मात्र, आता सुधारित नियमानुसार नववीत शिकत असलेल्या खेळाडूचे वय चौदा वर्षे वयोगटासाठी, अकरावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडूचे वय सतरा वर्षे वयोगटासाठी पात्र असेल तर ते त्या वयोगटात खेळू शकणार आहेत. अकरावीत शिकणारा खेळाडू सतरा वर्षांखालील वयोगटात सहभागी झाला असेल, तर अशा खेळाडूंनी शालेय स्पर्धेच्या ओळखपत्रासह गतवर्षाचे म्हणजेच दहावीतील प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक जोडणे आवश्‍यक आहे. जन्मतारखेप्रमाणे जो खेळाडू ज्या गटात खेळण्यास पात्र असेल, तो त्याच गटात खेळेल. त्याला इयत्तानिहाय वयोगटाची गरज उरणार नाही.

खेळाडूंच्या वय पडताळणीसाठी कागदपत्रे (किमान दोन कागदपत्रे आवश्‍यक)
- आधारकार्ड
- पासपोर्ट
- जन्म प्रमाणपत्र
- गतवर्षाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र

डोपिंगमध्ये दोषी ठरलेले खेळाडू
- अथेन्स ऑलिंपिक स्पर्धेत महिला वेटलिफ्टर प्रतिमा कुमारी व सनामाचा चानू
- मॅंचेस्टरमधील राष्ट्रकुल स्पर्धेत एस. राय व कृष्णन मदसामी
- दक्षिण कोरियात 2001 मधील स्पर्धेत कुंजुरानी
- हैदराबादमध्ये 2002 मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सात वेटलिफ्टर
- चेन्नईतील 2003 मधील कनिष्ठ गटाच्या स्पर्धेत चोवीस वेटलिफ्टर

खेलो इंडियांतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांत इयत्तेची अट नाही. या स्पर्धांत यंदा शालेय राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आठ संघ थेट खेळविले जाणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी अट नसेल, तर शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी अट कशाला हवी, असा विचार शालेय खेळ महासंघाने केला. तसेच, इयत्तेची अटही वगळली आहे. इयत्तेची अट रद्द झाल्याने खेळाडूंना खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- अरुण पाटील, क्रीडाधिकारी तथा कार्यासन प्रमुख

शालेय क्रीडा स्पर्धा
- जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात येणारे- 43
- विविध क्रीडा संघटनांतर्फे घेण्यात येणारे- 32
- कोल्हापूर जिल्ह्यातून शालेय राष्ट्रीय स्तरावर खेळणारे- सुमारे 225 ते 250
- खेलो इंडियातर्फे घेण्यात येणारे- 24

डोपिंगमध्ये दोषी आढळलेले क्रीडा प्रकार- शरीरसौष्ठव, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, ऍथलेटिक्‍स, कुस्ती आदी.

शालेय स्तरावर जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धांचे आयोजन केले जाते. या क्रमाने आयोजन झाल्याने दहावी व बारावीकरिता ग्रेस गुणांसाठी खेळाडू पात्र ठरतो. क्रीडा संघटना मात्र जिल्हा स्तरावरून थेट राज्य स्पर्धा घेतात. त्यामुळे या स्पर्धांत खेळाडूंना ग्रेस गुण दिले जात नाहीत.

दरवर्षी तालुकास्तरावर दहा क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. जिल्हास्तरावर 50 खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली.