मी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे ! - प्रा. डॉ. एन. डी. पाटील

मी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे ! - प्रा. डॉ. एन. डी. पाटील

कोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक चळवळीत काम करताना काही तरी विचार करूनच निर्णय घेतो. एन. डी. पाटील म्हणजे पाला-पाचोळा नाही, कोणी काही बोलल्यावर उडून जायला, अशी कानउघाडणी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी येथे केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले,

‘‘इचलकरंजीसाठी दानोळी येथून पाणी उपसा करता येणार नाही, यासाठी शनिवारी (ता. २) वारणा बचावचा नारा देत शिरोळ येथून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. इचलकरंजीसाठी मजरेवाडी येथून पाणी उपसा करण्यास कोणाचीही हरकत नाही; मात्र इचलकरंजीसाठी दानोळी येथूनच पाणी उपसा करायचा घाट घातला आहे, हे चुकीचे आहे.

वास्तव काय आहे, हे जाणून घेण्याऐवजी स्वत:च्या चुका झाकण्यासाठी कोणाला तरी फासावर चढवायचे म्हणून एन. डी. पाटील यांचे नाव घेतले जात आहे. उजवा कालवा रद्द केला नसता तर १७० गावांच्या पाण्याचा प्रश्‍न निकालात निघाला असता. मात्र, काहींच्या जमिनींना चांगला दर मिळणार असल्याने हा निर्णय त्यांनी स्वत:हून रद्द केला. त्यामुळेच पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘चौदा वर्षांची वॉरंटी असतानाही सध्या असलेली पाईपलाईन खराब झाली आहे. आता तर ५० वर्षांचा विचार करून तीन टीएमसीपर्यंत पाणी योजना आखली आहे. इचलकरंजीची गरज पाऊण टीएमसीची असताना तीन टीएमसी पाणी उपसा करून उद्योजकांना दिले जाणार आहे. यासाठीच आठ हजार अश्‍वशक्तीच्या पाच पंपाने पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या लोकांना १५ वर्षांसाठी असणारी योजना नीट ठेवता आली नाही; मग ५० वर्षांचे नियोजन कशासाठी करताय?’’

आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘‘वारणा बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (ता. २) सकाळी आठला शिरोळ येथून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. रॅली शिरोळ व शाहूवाडी येथून निघेल. त्यानंतर वारणानगर येथे दुपारी चारच्या सुमारास सांगता होईल.’’

यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, भगवान काटे उपस्थित होते.   

१७० गावांना टंचाईची झळ
वारणा उजवा कालवा बंद केला. या कालव्यात जमिनी जाऊ नयेत, यासाठी हा कालवा बंद केला. त्यामुळे १७० गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. शासकीय अधिकारीही चुकीची आकडेवारी सांगून धरणात मुबलक पाणी असल्याचे सांगत असल्याचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले.

उद्योजकांना पाणी देण्याचा घाट
इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी देणार नाही, असा आमचा अजिबात उद्देश नाही. वास्तविक इचलकरंजीच्या नावावर उद्योजकांना पाणी देण्याचा काहींचा घाट असल्याचेही श्री. एन. डी. पाटील यांनी सांगितले. 

काळ्या ओढ्यातून दूषित पाणी
आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘‘इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यातून दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. हे गांभीर्याने घेतले पाहिजे.’’ श्री. पाटील यांनी त्‍यासंदर्भातील व्हिडिओही पत्रकार परिषदेत दाखवला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com